वनविभागाची चमू दाखल : पायाच्या ठशावरुन वाघाबाबत संभ्रमविरूळ (आकाजी) : गावातील बसस्थानकाच्या रस्त्यात एका गावकऱ्याला वाघ दिसला. तो पाहताच त्याचा थरकाप सुटला. त्याने याची माहिती गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी लागलीच ती माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वनविभागाच्या चमूने गावात येत पाहणी केली असता त्यांना वाघ मिळून आला नाही; मात्र वाघाच्या पायाचे ठसे गावात दिसून असल्याने गावाकऱ्यांचा चांगलाच थरकाप उडाला आहे. विरुळ येथील व्यावसायिक विठ्ठल शिरभाते यांची विरुळ बस स्थानकावर पानटपरी आहे. नेहमी प्रमाणे ते गावावरुन बस स्थानकावरील दुकान उघडण्यासाठी पहाटे ५ वाजताच्या सुमारास जात होते. यावेळी त्यांना ऐन रहदारीच्या रस्त्यावर भला मोठा पट्टेदार वाघ दिसला. वाघ पाहताच त्यांना थरकाप सुटला. तो वाघ संतोष येळणे यांच्या शेतात दडून बसल्याची माहिती त्यांनी दूरध्वनीवरून मजुरांना दिली. लगेच गावकऱ्यांनी वनविभागाला या वाघाबाबत कळविले असता वनविभागाची चमू विरुळात दाखल झाली. चमूने वाघाचा शोध घेतला असता वाघ सापडला नसल्याने वनविभागाची चमू परत गेली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गावात असलेले वाघाच्या पायाचे ठसे तपासले असता ते स्पष्ट दिसत नसल्याने वाघ होता अथवा नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे. असे असले तरी वन विभागाची चमू गावात कार्यरत आहे. वाघ गावात आल्याचे समजताच गावकऱ्यांनी वाघ पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी वनविभागाचे भुयार, विरुळ बीटचे व्ही.बी. सोनटक्केद, डी.एम. पाकजवार, महिला कर्मचारी पुनसे व चंद्रशेखर शेंडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी वाघ शोधण्यासाठी प्रयत्न केले. हा वाघ पाचोडच्या जंगलात असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.(वार्ताहर)
गावाच्या मुख्य मार्गावर वाघाचे दर्शन
By admin | Updated: October 26, 2016 00:55 IST