फलक नावालाच : अरुंद मार्गावरील वाहतूक होते विस्कळीतवर्धा : शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी, वाहतुकीची कोंडी दूर व्हावी, याकरिता वाहतूक नियंत्रण विभागाने शहरातील काही मार्ग एकेरी वाहतुकीसाठी राखीव केलेत; पण सध्या ‘नो एन्ट्री’तून वाहन चालकांची सर्रास ‘एन्ट्री’ होत असल्याचे दिसून येत आहे़ हा प्रकार कोणत्या एकाच मार्गाबाबत होतोय, असे नव्हे तर सर्वच एकेरी रस्त्यांवर वाहन चालक शिरताना दिसतात़ वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़शहरातील बजाज चौक ते शिवाजी पुतळा या मुख्य मार्गावरील निर्मल बेकरी चौकात नो एन्ट्रीचा बोर्ड लावण्यात आला आहे. हा फलक लावून वाहतूक पोलिसांनी हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी खुला ठेवला आहे; पण या मार्गावर सर्रास दुहेरी वाहतूक होताना दिसते़ याच चौकात थोडे पूढे वाहतूक पोलिसांचे जत्थे दिसून येतात; पण त्यांचे याकडे लक्षच राहत नाही़ शहरातील बेकरी मार्ग आधीच व्यावसायिकांच्या अतिक्रमणामुळे निमूळता झाला आहे़ काही वर्षांपूर्वी सरळ दिसणारा हा रस्ता आता नागमोडी झाला आहे़ यामुळे येथे ग्राहकांना वाहने उभे करण्याकरिताही जागा शिल्लक राहिलेली नाही. या रस्त्यावरून विरूद्ध दिशेने एखादे चारचाकी वाहन आले तर वाहतूक पूर्णत: ठप्प होते. वाहन चालकांच्या कर्नकर्कश हॉर्न वाजविण्याने हा परिसर दणाणून जातो. हा प्रकार या मार्गावर नित्याचा झाला आहे़ असे असताना याबाबत कायमस्वरुपी तोडगा काढला जात नाही. ‘नो एन्ट्री’ चा फलक असताना वाहनचालक येथून बिनधास्त प्रवेश करताना दिसतात. असाच प्रकार शहरातील अन्य मार्गावरही दिसून येतो़ अशा वाहन धारकांवर कारवाई करून त्यांना तंबी देण्याची मागणी नागरिकातून होत आहे. याकडे मागणीची दखल घेत कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
‘नो एन्ट्री’तून वाहनांचा प्रवेश
By admin | Updated: November 14, 2015 02:27 IST