अल्लीपूर : स्वातंत्र्यदिनी येथील ग्रामपंचायत समोरील प्रांगणात घेण्यात आलेली सभा विविध मुद्यांनी गाजली. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोकप्रतीनिधी आणि अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. सभेच्या अध्यक्ष पदावरून वादाची ठिणगी पडली. अध्यक्ष पदासाठी म्हणून पहिले नाव माणिक कलोडे व दुसरे नाना ढगे यांचे नाव समोर करण्यात आले. परंतु हे दोघेही नवे असल्याने टोकाचा विरोध झाला. परिणामी तुळशीराम साखरकर यांची अध्यक्ष निवड करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी गव्हाळे यांनी सभेच्या विषयाचे वाचन केल. कृषी अधिकारी यांनी शासनाच्या योजनांची माहिती देतानाच नागरिकांनी साहित्य वाटपात आपण घोटाळा केला व जवळच्या नेत्यांनाच फिरायाला नेता असे म्हणात साहित्याच्या वाटप धारकांची यादी द्या असे म्हणत त्यांना धारेवर धरले. नागरिकांना पाहिजे ती माहिती उपलब्ध नसल्याने अनेक प्रश्नांचा भडीभार करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी, विद्युत वितरण कंपनी अभियंता,पशु वैद्यकीय अधिकारी, जि. प. मुख्याध्यापक व ठाणेदार यावेळी उपस्थित नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाहीच्या संदर्भात सूचना करण्यात आल्या. बिहार पॅटन वृक्ष लागवड खर्च यासंदर्भात रोजगार सेवक राजू कळमकर माहिती देत असताना मधुकर पडवे व्यत्यय आणत होते. त्यामुळे माजी सरपंच गजु नरड यांनी आक्षेप घेतला. यामुळे दोघांत वाद झाला. प्रकरण हाणामारीवरही गेले. रॉकेलचा पूर्ण ड्राम अल्लीपूर येथे वितरित न करता हिंगणघाट येथे विकत असल्याचा मुद्दा अविनाश सुरकार यांनी उपस्थित केला, तर गावात मुबलक दारू विक्री होत असून पोलीस लक्ष देत नसल्याबद्दल सभेत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. यानंतर तंटामुक्ती अध्यक्षांच्या निवडीचा विषय घेण्यात आला. पदासाठी सतीश काळे, धनराज सुपारे, निखील कातोरे यांनी नावे दिली. ईश्वर चिठ्ठी, मतदान, हात वर करणे हे मतदानाचे सर्व पर्याय उपलब्ध असताना कातोरे यांनी अर्ज मागे घेवून सुपारे यांना समर्थन घोषित केले. त्यामुळे दोन्ही गटात गदारोळ माजला. अध्यक्षांनी ग्राम सभेची सहमती व दुसऱ्या उमेदवारी अर्जाचा आक्षेप विचारात न घेताच धनराज सुपारे यांची अध्यक्ष म्हणून निवड केली. याला विरोध करीत उमेदवार सतीश काळे यांनी ग्रामविकास अधिकारी यांना रितसर तक्रार दिली. त्यामुुळे तंटामुक्तीचे अध्यक्षपद वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. पो. स्टे. अल्लीपूर व गटविकास अधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांना तक्रार देण्यात आली आहे. त्याचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)
विविध मुद्यांनी गाजली अल्लीपूरची सभा
By admin | Updated: August 17, 2015 02:17 IST