लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एकीकडे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरु असताना दुसरीकडे लसीकरणही वेगाने सुरु आहे. जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत तब्बल १ लाख ६६ हजार ७५५ नागरिकांना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यामुळे लसीकरण वेगात होत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत १ लाख ४३ हजार ४४७ नागरिकांनी पहिला तर १९ हजारावर नागरिकांनी दुसरा डोस घेतल्याची माहिती आहे.लसीकरणासाठी नागरिक अधिक सजग झाले असून स्वयंस्फूर्तीने लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी जात असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला होता. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवकांचे , ५ फेब्रुवारीपासून फ्रंट लाईन वर्कर्स आणि ४५ वर्षांवरील कोमॉर्बिड व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. १ एप्रिलपासून जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात आले. जिल्हा रूग्णालये, ग्रामीण रूग्णालये, सर्व प्राथमिक आराेग्य केंद्रांसह अशा एकूण जिल्ह्यातील ४८ लसीकरण केंद्रांवर नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात लसींचा साठा संपला होता. लसीकरणास मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनातर्फे शासनाकडे दोन लाख अतिरिक्त लस साठ्याची मागणी नोंदविली होती. त्यानुसार जिल्ह्याला नुकतेच १८ हजार ३६० लस जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाल्याची माहिती आहे.