महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एकाचदिवशी तब्बल १५ हजार व्यक्तींना काेविडची प्रतिबंधात्मक लस देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यात सोमवारी लसीकरण मोहिमेला नव्या जोमाने गती देण्यात आली. या लसीकरण मोहिमेला वर्धेकरांनीही स्वयंस्फूर्त प्रतिसाद देत सोमवारी एकाच दिवशी तब्बल १३ हजार ३८९ व्यक्तींनी कोविडची लस घेतली. एकाच दिवशी १३,३८९ व्यक्तींना लसीकरण करून आराेग्य विभागाने जिल्ह्यात नवीन विक्रम नोंदविला आहे.रविवारी शासनाकडून लसीचा साठा उपलब्ध होताच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील तब्बल ७१ केंद्रांवरून लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याचे निश्चित करण्यात आले. प्रत्येक केंद्रावरून ऑनलाईन शेड्यूल घेऊन येणाऱ्यांसह स्पॉट नोंदणी करणाऱ्यांना कोविड व्हॅक्सिन देण्यात आले. सोमवारी सहा हेल्थकेअर वर्कर्सनी, ६६ फ्रन्टलाईन वर्कर्सनी, १८ ते ४४ वयोगटातील ५ हजार ९९२, ४५ ते ६० वयोगटातील ४ हजार ५४४, तर ६० पेक्षा जास्त वयोगटाच्या २ हजार ८६१ लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतली.
लस कोंडीमुळे येताहेत अनेक अडचणीजिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पण सध्या अतिशय अल्प लसीचा साठा पाठवून वर्धा जिल्ह्याची कोंडी केली जात आहे. असे असले तरी तोकड्या लसीच्या जोरावर वर्धेचा आरोग्य विभाग मोठी मजल मारत आहे. शासनानेही वर्धा जिल्ह्यातील नागरिकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन वर्धा जिल्ह्याला मुबलक लसीचा साठा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.लसीकरण मोहिमेने ओलांडला ४.१४ लाखांचा टप्पा- जिल्ह्यात लसीकरण मोहिमेने ४.१४ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत ३ लाख २८ हजार ७९९ व्यक्तींना कोविड व्हॅक्सिनचा पहिला, तर ८५ हजार २३९ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तशी नाेंद आरोग्य विभागाने घेतली आहे.
कोविड व्हॅक्सिनेशन मोहिमेला जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी पूर्वीचे विक्रम मोडत एकाच दिवशी १३ हजार ३८९ व्यक्तींना कोविडची लस देऊन जिल्ह्यात नवा विक्रम नोंदविण्यात आला आहे. शासनाकडून टप्प्या-टप्प्याने लस उपलब्ध होत आहे.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.