आशुतोष सलिल : ९२० शेतकऱ्यांना मिळणार लाभवर्धा : सौर कृषिपंपाच्या माध्यमातून पाच एकर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना विजेच्या देयकापासून कायम मुक्त होता येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सिंचनासाठी असलेल्या सौर कृषिपंप योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी केले. सौर कृषिपंपाचा प्रात्याक्षिक कार्यक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. पाच एकर पेक्षा कमी शेती असलेले व पाण्याची सुविधा असलेल्या ९२० शेतकऱ्यांना योजनेच्या माध्यमातून केवळ पाच टक्के शेतकरी लाभार्थी हिस्सा भरल्यानंतर योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार तीन, पाच व साडेसात अश्वशक्तीचे सौर पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरिता केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमतीच्या केवळ पाच टक्के हिस्सा शेतकऱ्यांना भरावयाचा आहे. पंप पुरविणारी कंपनी पाच वर्षापर्यंत देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी स्वीकारणार आहे. सोलर पंप सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत कार्यरत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार ओलित करणे शक्य आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
सिंचनासाठी सौर कृषिपंप वापरा
By admin | Updated: January 13, 2016 02:43 IST