प्रवाश्यांची मागणी : भय्यापूरवासीयांची बसअभावी पायपीटमोझरी (शेकापूर) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस ही ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजली जाते. ग्रामीण भागातील प्रवाश्यांना दळणवळणाची साधने कमी प्रणाणात उपलब्ध असल्याने बसवर अवलंबून राहावे लागते. विभागाच्या गलथानपणाचा फटका मोझरी परिसरातील प्रवाश्यांना बसत आहे. या मार्गे जाणाऱ्या बसचा मार्ग बदलल्याने प्रवाश्यांची ताटकळ होत आहे.मोझरीकरिता वर्धा-साती, वर्धा-वरूड ही बसफेरी कानगाव, भैय्यापूर फाटा, मोझरी (शेकापूर) मार्गे धावत होती. परिसरातील प्रवाश्यांना ही बस अत्यंत सोयीची होती. परंतु गत काही दिवसांपासून या बसचा मार्ग बदलविण्यात आल्यामुळे ही बस कानगाव, डौलापूर असा बदलविण्यात आला. त्यामुळे भैय्यापूर वासीयांची फजिती होत आहे. भैय्यापूर हे गाव कानगाव, मोझरी(शे.) मार्गावर असून या स्टॉपवर प्रवाश्यासाठी प्रवासी निवारा बांधण्यात आला आहे. परंतु येथे बस येतच नसल्याने हा निवारा निरर्थक ठरत आहे. भैय्यापूर येथील प्रवाश्यांना दीड कि.मी. अंतर चालत येऊन बसथांब्यावर यावे लागते. परंतु मार्ग बदलविल्याने येथील प्रवाश्यांची गोची झाली आहे. शिवाय आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रवाश्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. बसच्या पूर्वीच्या मार्गात बदल केल्यामुळे भैय्यापूर येथील प्रवाश्यांना खासगी वाहनांशिवाय पर्याय नसल्याने यात बराचवेळ ताटकळ होत आहे. या समस्येची दखल घेवून बसफेरीचा मार्ग पूर्ववत करण्याची मागणी वरिष्ठांकडे प्रवाश्यांनी केली असून कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)
एसटीचा मार्ग पूर्ववत करा
By admin | Updated: December 28, 2015 02:29 IST