सभेचा सूर : संत्र्यांच्या गुणवत्तावाढीवर झाली चर्चाकारंजा (घा.) : महाराष्ट्रात ६० हजार हेक्टरमध्ये द्राक्ष, ४० हजार हेक्टरमध्ये डाळींब तर दीड लाख हेक्टरमध्ये संत्रा उत्पादन घेतले जाते; पण शासनाचे संत्रा उत्पादनाकडे फारसे लक्ष नाही. शासनावर प्रभाव गट निर्माण करण्यास संत्रा उत्पादक असमर्थ ठरला आहे यामुळेच संत्रा उत्पादकांची दुरवस्था झाली आहे, असा सूर युवा संत्रा उत्पादकांच्या सभेत उमटला.महाआॅरेंज संस्थेतर्फे येथील संत्रा निर्यात व प्रक्रिया केंद्रावर युवा संत्रा उत्पादकांची विशेष सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महाआॅरेंजचे अध्यक्ष अनंत धारड तर अतिथी म्हूणन सुधीर जगताप, विवेकानंद अतकरे, श्रीधर ठाकरे, प्रशांत कुकडे, नामदेव खेरडे, मनोज जवंजाळ, उद्धव बडे, शिवाजी खवशी, राहुल ठाकरे उपस्थित होते. आष्टी, आर्वी, वरूड, कांरजा, अचलपूर येथील युवा संत्रा उत्पादकांनी चर्चेत भाग घेतला.धारड यांनी संत्रा उत्पादन व गुणवत्ता वाढीसाठी उत्तम दर्जाच्या कलमा तयार केल्या पाहिजे. विविध जातीचे संशोधन केले पाहिजे. ‘सी ग्रेड’ संत्रावर प्रक्रिया करून ज्यूस तयार केला पाहिजे. यातून उत्पादन वाढेल, असे सांगितले. जगताप यांनी संत्र्याला चांगला बाजारभाव मिळण्यासाठी गुणवत्ता वाढविणे गरजेचे आहे. कलमा तयार करण्याचे नवे तंत्रज्ञान तालुका स्तरावर पोहोचले पाहिजे. किड नियंत्रण, आहार व जल व्यवस्थापन याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे सांगितले. अतकरे यांनी चिकू या पिकाबद्दल अनुभव कथन केले. संचालक श्रीधरराव ठाकरे यांनी २००८ मध्ये स्थापन महाआॅरेंज संस्थेचा संत्रा उत्पादकांच्या विकासात कसा उपयोग झाला, हे सांगितले. संचालन जंवजाळ यांनी केले. उत्पादकांनी बैठकीबद्दल समाधान व्यक्त केले.(तालुका प्रतिनिधी)
प्रभाव गट निर्माण करण्यात संत्रा उत्पादक असमर्थ
By admin | Updated: October 3, 2016 00:43 IST