वर्धा : वायगाव नजीकच्या सिरसगाव (ध.) येथील महिलेला इंदिरा आवास योजनेचा लाभ देण्यात आला़ यात मंजूर घरकुलाचे बांधकाम करण्यास सांगण्यात आले़ यातील पहिला धनादेशही शासनाने प्रदान केला; पण तो धनादेश दोन महिने लोटूनही बँकेतून वठला नाही़ यामुळे लाभार्थी महिला अडचणीत आली आहे़अनुसया रामचंद्र ढाकरे या महिलेचे नाव सिरसगाव (ध़) ग्रा़पं़ ने इंदिरा आवास योजनेच्या यादीत दिले़ यामुळे पंचायत समिती वर्धामार्फत घरकूल मंजूर झाले. पं़स़च्या अटींचे पालन करून सदर महिलेने स्वत:च्या रकमेचे घरकुलाच्या बांधकामास सुरूवात केली़ यात प्रथम अनुदान म्हणून ३५ हजार रुपयांचा ५५४४२ क्रमांकाचा अॅक्सीस बँकेचा धनादेश प्राप्त झाला़ सदर धनादेशावर ०४ मार्च हा दिनांक नमूद होता़ लाभार्थी अनुसया ढाकरे यांनी धनादेश भारतीय स्टेट बँक वर्धा येथे जमा केला़ धनादेश बँकेत देऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला; पण अद्याप रक्कम खात्यात जमा झाली नाही़ याबाबत लाभार्थी महिलेने बँकेत विचारणा केली असता उडवाउडीची उत्तरे दिली आहे़ या प्रकरणी सिरसगावचे उपसरपंच अमोल उघडे व लाभार्थी महिला ढाकरे यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले़ सदर धनादेशाची अॅक्सीस बँकेतून रक्कम कपात झाली; पण लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. याबाबत चौकशी करण्याची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
घरकूल योजनेतील धनादेश वठण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी
By admin | Updated: May 9, 2015 02:02 IST