कंपनीशी विश्वासघात : एटीएममध्ये भरावयाच्या पैशात घोळ वर्धा : एटीएममध्ये पैसे भरण्याची जबादारी असलेल्या एका कंपनीच्या कर्मचाऱ्याने दिलेली पूर्ण रक्कम एटीएम मशीनमध्ये न भरता त्यातील दोन लाख रुपयांची अफरातफर केल्याचा प्रकार शुक्रवारी उघड झाला. याप्रकरणी सदर कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या सहकारी कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय शालीकराम पाली (३१) रा. कुंजीलाल पेठ भगवान नगर, अजनी, नागपूर हे सीएमएस कंपनीत कार्यरत असून ही कंपनी बँकेची रक्कम एटीएम मशीनमध्ये भरण्याचे काम करते. याच कंपनीत नरेश वासुदेव चौधरी रा. बोरगाव (मेघे) हा सुद्धा काम करीत होता. त्याला एटीएम मशीनमध्ये भरण्याकरिता पैसे दिले असता त्याने पूर्ण रक्कम एटीएममध्ये न भरता १ लाख ९१ हजार ६०० रुपये स्वत:कडे ठेवून घेतले. ही बाब कंपनीच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकरणी वर्धा यहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला. विजय पाली यांनी दिलेल्या तक्रारीवरून नरेश चौधरी याच्यावर भांदविच्या कलम ४२०, ४०६, ४०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)
कर्मचाऱ्याकडून दोन लाखांची अफरातफर
By admin | Updated: October 9, 2016 00:32 IST