लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : भरधाव कार आणि दुचाकीसमोर अचानक रोह्याचा कळप आल्याने दोन्ही वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अशातच दोन्ही वाहनांत धडक झाली. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला, तर कारचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात हिंगणघाट-कानगाव मार्गावर रविवारी दुपारी झाला. दुचाकीवरील दोघेही लग्नसोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका वितरीत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला, हे विशेष.भगवान मरस्कोल्हे (२५) व जागो कोडापे (२४) हे दोघे गावाबाहेरील नातेवाईकांसह निकटवर्तीयांना लग्नाची निमंत्रण पत्रिका देऊन रविवारी दुपारी परतीचा प्रवास करीत होते. दुचाकी हिंगणघाट-कानगाव मार्गाने जात असताना समोरून अचानक एम. एच ३२ ए. एच. ५५५३ क्रमांकाची कार येत होती. अशातच या दोन्ही वाहनांच्या समोर रोह्यांचा कळप आल्याने दोन्ही वाहनचालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनांवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच कार आणि दुचाकीत जबर धडक झाली. यात भगवान मरस्कोल्हे व जागो कोडापे यांचा मृत्यू झाला तर कारचालक स्नेहल रेवतकर (३२) हा गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत अपघाताची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच जमादर संजय रिठे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. या अपघाताची नोंद अल्लीपूर पोलिसांनी घेतली असून पुढील तपास ठाणेदार सुनील गाडे करीत आहेत.