तिघे अटकेत : आर्वी, कारंजा पोलिसांची कारवाईवर्धा : आर्वी आणि कारंजा पोलिसांनी केलेल्या तीन कारवायांत जवळपास दोन लाख ५० हजारांचा दारूसाठा वाहनासह जप्त करण्यात आला. पोलीस सूत्रानुसार, आर्वी पोलिसांनी देऊळवाडा रोडवर मंगळवारी रात्री नाकाबंदी केली होती. दरम्यान एका वाहनाची तपासणी केली असता त्यात ३३२ लिटर गावठी मोहादारू आढळली. यात एक लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करून दिनेश जानराव सवई (२४) रा. आर्वी यास अटक केली. ही कारवाई ठाणेदार साळवी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक थोटे, पोलीस उपनिरीक्षक हिवाळे, हवालदार विजय तोडसाम, अखिलेश गव्हाणे, अश्विन सुखदेवे, विशाल मडावी, चंदू वाळके, महादेव, सुरज आदींनी केले. तसेच कारंजा पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान कारंजा महामार्गावर दोन वेगवेगळ्या घटनेत तीन पेटी देशी दारू जप्त करून ७३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दीपक चौधरी रा. गवंडी हा एमएच ३१ एल ५६८ या दुचाकीने दारूची वाहतूक करीत असताना त्याच्याकडून एक पेटी देशी दारू जप्त करण्यात आली. तसेच निलेश खैरे रा. धावसा हेटी हा एमएच ३२ जे-४३२१ या वाहनाने दारूची वाहतूक करीत होता. त्याच्याकडून दोन पेट्या देशी दारू जप्त केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक जगदीश गराड, शिपाई मनीष कांबळे यांनी केली.(शहर प्रतिनिधी)
तीन कारवायांत अडीच लाखांचा दारूसाठा जप्त
By admin | Updated: July 23, 2015 02:02 IST