कवडघाट शिवारातील घटना : चालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला हिंगणघाट: आंध्र प्रदेशातील करनुल येथून चण्याचे कुटार घेऊन बुटीबोरीकडे जात असलेल्या भरधाव ट्रकला अचानक आग लागली. सदर घटना ट्रकच्या मागाहून येणाऱ्या कारचालकाला लक्षात आली. त्याने आग लागल्याची माहिती ट्रकचालकाला दिली. ट्रकचालकानेही आपल्या जीवाची पर्वा न करता आग लागलेला ट्रक थेट वणा नदी पात्रात नेऊन उभा केला. शर्तीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कवडघाट शिवारात घडली.आंध्र प्रदेशातील करनुल येथून ए.पी. २७ टी.टी. ७४४९ क्रमांकाचा ट्रक चण्याचे कुटार घेऊन बुटीबोरीकडे रवाना झाला होता. भरधाव ट्रक राष्ट्रीय महामार्गावर हिंगणघाट शहरानजीक आला असता ट्रकमधून धूर निघत असल्याचे ट्रकच्या मागाहून येणाऱ्या कारचालकाच्या लक्षात आले. त्याने तात्काळ घटनेची माहिती ट्रकचालकाला दिली. आग लागल्याचे लक्षात येताच ट्रकचालक शेख बादशाह अब्दुल हमीद (५७) याने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आग लागलेला ट्रक थेट कवडघाट शिवारातील वणा नदीच्या पात्रात नेऊन उभा केला. ट्रकचालकाने परिसरातील नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळाले. घटनेचह माहिती हिंगणघाट पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस शिपाई नाना हाडके व गजानन काळे व अल्लीपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. या घटनेची हिंगणघाट पोलिसांनी नोंद घेतली आहे. घटनेत ५ हजार रुपये किंमतीचे चण्याचे कुटार जळाले; परंतु, वाहनचालकाच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. ट्रकमध्ये एकूण दोन लाखांचे कुटार होते, असे चालकाने सांगितले.(तालुका प्रतिनिधी)
कुटार घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग
By admin | Updated: March 26, 2017 01:01 IST