पुलगाव : वर्धा मार्गावरील शिव मंदिराच्या वळणावर दोन ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली़ यात ट्रक चालक सोमनाथ काशिनाथ पांढरे (२२) रा. आबणा, ता. भोकरधन, जि. जालना यांचा जागीच मृत्यू झाला़ हा अपघात बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथून वर्धेकडे एम़एच़ १५ ए़जी़ ७९०० हा ट्रक सोयाबीन घेऊन जात होता तर विरूद्ध दिशेने वर्धा येथून पुलगावकडे ट्रक एम़ एच़ ०४ ई़एल़ ४०१ किराणा सामान घेऊन येत होता. भरधाव दोन्ही ट्रकची शिवमंदिराच्या वळणावर जोरदार धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की सोयाबीनने भरलेल्या ट्रकचा पुढील भाग अक्षरश: चक्काचूर झाला. चालक सोमनाथ पांढरे यांच्या चेहऱ्याला गंभीर मार लागला. गुडघ्याखालून दोन्ही पाय तुटले. त्यांचा या धडकेत जागीच मृत्यू झाला. अपघातात दुसऱ्या कुणाला साधी दुखापतही झाली नाही, हे विशेष! पोलिसांनी त्वरीत घटनास्थळ गाठून मृतकास ग्रामीण रुग्णालयात आणले. पूढील तपास ठाणेदार राजेंद्र तायडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय चौधरी, जमादार डांगे व इतर कर्मचारी करीत आहेत़(प्रतिनिधी)
ट्रकची समोरासमोर धडक; चालक ठार
By admin | Updated: March 26, 2015 01:41 IST