लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव ट्रकने समोरुन येणाऱ्या ट्रकला धडक दिली. यात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर क्लिनर गंभीर जखमी झाला. हा अपघात पुलगाव येथून १३ कि. मी. अंतरावर असलेल्या केळापूरजवळ १२ रोजी शनिवारी रात्रीच्या सुमारास झाला. रवी भास्कर जाधव (२६, रा. मेहेकर, जि. बुलढाणा) असे मृताचे नाव असून, क्लिनर प्रकाश सुखदेव लष्कर हा गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृत रवी भास्कर जाधव हा एमएच २८ बीबी ०९३३ क्रमांकाच्या ट्रकमध्ये अंगूर भरुन नागपूरकडे भरधाव जात होता. दरम्यान, समोरील वाहनाला ओव्हरटेक करीत असतानाच नागपूरहून पुलगावकडे जाणाऱ्या युपी ६० एटी ५०८० क्रमांकाच्या ट्रकला जबर धडक दिली. या अपघातात रवी भास्कर जाधव याचा जागीच मृत्यू झाला, तर प्रकाश लष्कर हा गंभीर जखमी झाला. पुलगाव पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे.
ट्रकचा झाला चुराडा- अपघात इतका भीषण होता की, ट्रकचा समोरील भाग पूर्णत: चुराडा होऊन त्याचा आकारच बदलला होता. रात्रीच्या काळोखात अपघात झाल्याने काही वेळापर्यंत दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. तसेच ज्या ट्रकला धडक दिली. त्या ट्रकमधील चालक अमोल घुगरे (रा. अहमदनगर) आणि क्लिनर शेख गफ्फार शेख रहीम यांना किरकोळ मार लागला असून, त्यांच्या ट्रकचेही मोठे नुकसान झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. रस्त्यावर द्राक्षांचा सडा अन् नागरिकांची गर्दी - द्राक्ष भरलेल्या ट्रकचा शनिवारी रात्री अपघात झाल्याने रस्त्यावर अंगुरांचा सडाच पडला होता. रविवारी सकाळ होताच अवागमन करणाऱ्या नागरिकांनी गर्दी करीत अंगुराच्या पेट्या घेण्यासाठी गर्दी केली होती. अनेक लहान मुले, महिला तसेच परिसरातील नागरिकांनी अंगूर नेण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.