विष्णू सावरा : सल्ला गांगरा आदिवासी शक्तिस्थळाचे लोकार्पणवर्धा : आदिवासींच्या विकासासाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. त्या योजनांचा लाभ प्रत्येकाने घ्यावा. शिक्षण, प्रशिक्षण, उद्योजकातून स्वत:बरोबरच समाजाचा विकासही साधावा, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केले.वर्धा जिल्हा संयुक्त आदिवासी कृती समितीच्यावतीने आयोजित आयटीआय टेकडीवरील बिरसा मुंडा क्रीडा संकुल येथे ५२ फूट सल्ला गांगरा आदिवासी शक्तीस्थळाच्या लोकार्पण व उप वर-वधू परिचय मेळाव्यात रविवारी ते बोलत होते. यावेळी आ. डॉ.पंकज भोयर, माजी खासदार दत्ता मेघे, वासुदेवशहा टेकाम, बापूराव उईके पाटील, पोलीस उपअधीक्षक रविंद्र किल्लेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, समितीचे अध्यक्ष राजू मडावी, अवचित सयाम उपस्थित होते.ना. सावरा म्हणाले, वर्धा जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाचे सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालय व्हावे, ही अनेक वर्षांची मागणी होती. ती आता मान्य करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात तात्काळ या कार्यालयातून काम सुरू होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.शासनामार्फत नामांकित शाळांमध्ये आदिवासी बांधवांची पाल्य शिकली पाहिजेत या उद्देशाने राज्यात २२ हजार विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत प्रवेश देण्यात आलेला आहे. या नामांकित शाळांचे शुल्क राज्य शासनामार्फत दिले जाते. विद्यार्थ्यांनी उच्च विद्याविभूषित होण्याचा ध्यास घेतला पाहिजे. त्यातून समाजाचा विकासही करण्याचा संकल्प केला पाहिजे. राज्यात सद्यस्थितीला २०६ आश्रमशाळा आणि वसतिगृहांचे बांधकाम सुरू करण्यात आलेले आहे, असेही ते म्हणाले. आ. डॉ.पंकज भोयर म्हणाले, सल्ला गांगरा आदिवासी शक्ती स्थळ विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. या शक्ती स्थळाच्या बाजूने सुरक्षा भिंंत आवश्यक आहे. त्यासाठी आपण पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, पोलीस उपअधीक्षक आर.जी. किल्लेकर, वासुदेवशहा टेकाम, नगरसेवक शरद आडे यांनीही यावेळी विचार मांडले. प्रारंभी शक्तीस्थळाचे लोकार्पण ना. विष्णू सावरा यांच्या हस्ते करण्यात आले. वर्धा येथे आदिवासी विकास विभागाच्या स्वतंत्र सहायक प्रकल्प अधिकारी कार्यालयास मंजुरी दिल्याबद्दल वर्धा जिल्हा संयुक्त आदिवासी कृती समितीच्यावतीने ना. सावरा आणि आ. डॉ. भोयर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या विदर्भस्तरीय उपवर-वधू परिचय मेळाव्याच्या स्मरणिकेचे विमोचन झाले. प्रास्ताविक राजू मडावी यांनी केले. संचालन करीत आभार रवींद्र मसराम यांनी मानले.(प्रतिनिधी)
आदिवासी बांधवांनी योजनांचा लाभ घेत विकास साधावा
By admin | Updated: February 1, 2016 02:01 IST