लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निर्धन व दुर्बल रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार देण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यात धर्मादाय रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यात पाच धर्मादाय रुग्णांलये जिल्ह्यात आहेत. असे असून सुद्धा धर्मादाय रुग्णालयांत पाहिजे त्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येत नसल्याचे वास्तव्य आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर धर्मादाय रुग्णांलयाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेला प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर धर्मादाय रुग्णालयातील सेवेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयात निर्धन व दुर्बल घटकांसाठी खाटा राखीव ठेवल्याचे दिसून येते. या रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळतो की नाही, यावर सहायक धर्मादाय आयुक्त यांची निगराणी असते. त्यानुषंगाने प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेऊन गरीब रुणांच्या उपचाराबाबतची तपशीलवार माहिती घेतली जाते. आवश्यक त्या सहायक धर्मादाय आयुक्ताकडून सूचना संबंधित रुग्णालय प्रशासनाला दिल्या जातात.
कोणाला मिळतो योजनेचा लाभआर्थिक दुर्बल आणि कमी उत्पन्न गटातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार सुविधेचा लाभमिळतो. त्यांच्यासाठी दहा टक्के खाटा आरक्षित ठेवणे रुग्णालय प्रशासनाला बंधनकारक आहे. तसे नसले, तर कारवाई करता येते.
धर्मादाय रुग्णालयात किती खाटाकस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे ९७, आर्चाय विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे येथे १५३, शरद पवार डेन्टल हॉस्पिटल सावंगी मेघेत २, महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालय सालोड हिरापूर येथे २५ तर शालिनीताई मेघे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंगी मेघे ३२ राखीव खाटा उपलब्ध आहेत.
ही आहेत ती ५ धर्मादाय रुग्णालयेमहात्मा गांधी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे, शरद पवार डेन्टल कॉलेज व हॉस्पिटल सावंगी मेघे, महात्मा गांधी आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल, रिसर्च सेंटर सालोड हिरापूर, शालिनीताई मेघे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सावंगी मेघे, असे रुग्णालयांचे नावे आहेत.