वर्धा : नाबार्ड आणि प्रयास यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गट प्रमुखांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम राबविला जात आहे़ यात जिल्ह्यातील २० गावांत महिला बचत गटांच्या प्रमुखांची दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली़ यात सुमारे ६०० महिलांनी सहभाग नोंदविला़ कार्यशाळेत बचत गटाचे महत्त्व, संकल्पना, उद्देश, काम करण्याची पद्धत, गटांची वैशिष्ट्य, फायदे, बचत गटाच्या पदाधिकाऱ्यांची निवड व त्यांचे कार्य, बचत गटांची आदर्श नियमावली, कर्जाविषयीचे धोरण, बँक खाते, कर्ज नियम आणि हिशेबाची माहिती, मासिक सभा कशी घेतली जाते आदींचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले़ बचत गट यशस्वीपणे चालविण्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यात आल्या़ बचत गटांच्या मुल्यांकनाची माहिती उपस्थित बचत गटांना देण्यात आली़ बचत गटांची नियमावली सर्व महिलांनी मिळून तयार केली़ बैठकीची सुरूवात व समारोप भजन, समूही गीताने करावी, सभासद ही गावातील रहिवासी असावी, पदाधिकाऱ्यांची निवड दरवर्षी व्हावी, गटाचा ठराव घेऊनच बँकेतून पैसे काढावे, मासिक बैठकीची एक ठराविक तारीख निश्चित करावी, मासिक बैठक नियमित व्हावी, नियोजित तारखेला बचतीची रक्कम न भरल्यास त्या गटाच्या नियमानुसार दंड आकारावा यासह बचत गटांच्या विविध कार्यांबाबत प्रशिक्षण देण्यात आले़ कार्यशाळेत डॉ़ स्रेहलता बनसोड, देवपुजारी, मनोज राऊत, सीमा लोखंडे, दिप्ती नवले, नूतन सांगोडे, प्रतीभा भगत, एकनाथ नरड आदींनी मार्गदर्शन केले़(कार्यालय प्रतिनिधी)
बचत गट प्रमुखांचे प्रशिक्षण
By admin | Updated: March 14, 2015 02:03 IST