हिंगणघाट : स्थानिक पंचायत समिती सभागृहात राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अंतर्गत क्रांतिज्योती ग्रामपंचायत महिला सदस्यांचे प्रशिक्षण राज्य शासन निवडणूक आयोग, यशदा प्रशिक्षण संस्था पुणे तथा जिल्हा परिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले़कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच विमल उगेमुगे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मनोज राऊत, शारदा धनवीज, पिंकी शंभरकर यांनी सहभागी महिला ग्रा.प. सदस्यांना मार्गदर्शन केले़ प्रास्ताविक पंचायत समिती विस्तार अधिकारी आऱबी़ राठोड यांनी केले़ राज्य निवडणूक आयोगाने क्रांतीज्योती प्रकल्पाअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थेतील नव्याने निवडून आलेल्या महिला सदस्यांची निर्णय क्षमता परिपक्व व्हावी, त्यांनी सामाजिक व राजकीयदृष्ट्या सक्षम व्हावे, त्यांच्यातील नेतृत्व विकसित व्हावे, त्या महिला इतर महिलांसाठी आदर्श ठराव्या हे या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अभिप्रेत असल्याचे आयोजकांनी सांगितले. निवडून आल्यानंतर महिला सदस्यांनी ग्रामसभेत यशस्वीपणे सहभाग दर्शवून गाव विकासात सहभागी व्हावे, पाणी, आरोग्य, शिक्षण, अन्न, सुरक्षा, रोजगार, महिला विकासाच्या कल्याणकारी योजना या सारखे विकासाचे प्रश्न ग्रामसभेच्या अंजेड्यावर आणावे, गाव विकासाची कामे करताना सामाजिक समस्या, अज्ञान, अंधश्रद्धा, निरक्षरता, लिंगभेद, कौटुंबिक हिंसाचार, व्यसनाधिनता, पर्यावरण समतोल, त्यावरील उपाययोजनांवर भर कसा देता येईल यावर भर देण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणात २५ महिला सदस्य, सरपंच, उपसरपंचांचा सहभाग होता. विभागीय प्रकल्प उपसंचालक नागपूर राजेंद्र मेश्राम, रवींद्र खैरकार आदींची उपस्थिती होती. संचालन मनोज राऊत यांनी केले. आभार शंभरकर यांनी मानले़ (तालुका प्रतिनिधी)
ग्रामपंचायत महिला सदस्यांना प्रशिक्षण
By admin | Updated: January 17, 2015 23:04 IST