अंगावर एकूण १४ जखमा : ठाण्यात नेऊन पाच वेळा केली मारहाणवर्धा: नो पार्कींग झोनमध्ये वाहन उभे केल्याचा आरोप करून वाहतूक पोलीस निरीक्षकाने त्याच्या सहकार्यासह बेदम मारहाण केल्याचा आरोप आनंद सुरेश बोरकर नामक युवकाने शुक्रवारी केला. वाहतुकीची व्यवस्था सांभाळण्याचा दहा दिवसाचा प्रभार मिळालेल्या या अधिकाऱ्याच्या उद्दाम पणाबाबत सर्वत्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे जाणाऱ्या मार्गावरील रसवंतीजवळ घडली. आनंद बोरकर (२२) याने केलेल्या आरोपानुसार, गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास तो रस पिण्याकरिता रसवंतीवर गेला होता. यावेळी वाहतूक पोलीस तिथे आले. ते तिथे येताच एक युवकाने पळ काढला. वाहनातून उतरेल्या दोन पोलिसांपैकी एक त्या युवकाच्या मागे धावला तर दुसरा आनंदकडे आला. त्याच्याकडे आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला तुझी गाडी नो पार्कींग झोनमध्ये उभी आहे, असे म्हणत ५०० रुपयांची मागणी केली. सदर कर्मचाऱ्याला येथे नो पार्कींगचा फलक कुठे आहे, असे विचारताच त्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. याच वेळी दुसरा कर्मचारी आला. त्याच्या हातून तो युवक सुटला असावा, त्यानेही येताच मारहाण करणे सुरू केले. दोघांकडून होत असलेली मारहाण पाहून वाहतूक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर आले. वाद सोडविण्याकडे लक्ष न देता त्यांनीही मारहाण केली. मारहाण झाल्यावर आनंदला वाहनात टाकून वाहतूक शाखेत आणण्यात आले. येथे आल्यावर त्याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या खोलीत नेत एक नाही तर एकूण पाच वेळा मारहाण केल्याचे त्याने सांगितले. या मारहाणीत त्याच्या अंगावर एकूण १४ जखमा झाल्या. येथे मारहाण केल्यानंतर त्याला शहर ठाण्यात नेण्यात आले. तिथे त्याला विचारपूस करण्यात आली. तिथून परत आल्यावर पुन्हा मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्याकरिता त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याला मारहाण नाही तर पडल्याने जखमा झाल्या असे सांगण्यास धमकाविण्यात आले.या प्रकरणातील जखमी आनंद बोरकर हा एका पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. त्याचे वडील सुरेश बोरकर नुकतेच आर्वी ठाण्यातून सेवानिवृत्त झाले आहे. मी पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे, माझ्या वडिलांना मला फोन करून द्या, असे आनंद म्हणत असतानाही पोलीस त्याचे एक ऐकत नव्हते. अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करून शुक्रवारी न्यायालयातून जामिनावर आनंदची सुटका झाली. या प्रकरणी वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे बोरकर म्हणाले. (प्रतिनिधी) चैन स्रॅचिंगच्या संशयावरून पकडलेगुरुवारी सकाळी शहरात चैन स्रॅचिंग झाली. त्या आरोपीच्या शोधात पोलीस असताना रसवंतीवर बसून असलेल्या सदर युवकावर संशय गेला. त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढला. यावरून वाहतूक पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान झालेल्या झटापटीत त्याला काही जखमा झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांकडून त्याला कुठलीही मारहाण करण्यात आली नाही. मारहाणीचा अधिकार वाहतूक पोलिसांना आहे काय ?या प्रकरणात आनंदला वाहतूक पोलिसांनी मारहाण केली. वाहतूक पोलिसांना आरोपी पकडण्यापर्यंत ठीक आहे, पण त्याला मारहाण करण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना आहे काय असा प्रश्न येथे समोर येत आहे. वाहतूक पोलिसांकडून झालेल्या या मारहाणीबाबत रोष व्यक्त होत आहे. आनंद बोरकर हा पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे याची माहिती आहे. वाहतूक पोलीस गुरुवारी सकाळी झालेल्या एका चैन स्रॅचिंगच्या प्रकारातील आरोपीच्या शोधात होते. यात रसवंतीवर बसून असलेल्या सदर युवकावर पोलिसांचा संशय गेला. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढला. यात पोलीस कर्मचारी व त्याच्यात झालेल्या झटापटीत त्याला इजा झाली. पोलिसांकडून कुठलीही मारहाण करण्यात आली नाही. - ओमकांत चिंचोळकर, वाहतूक निरीक्षक, वर्धा़वाहतूक पोलिसांची अरेरावी वाढीवर ?शहरात सध्या वाहतूक पोलिसांची अरेरावी वाढत असल्याची चर्चा जोर धरत आहे. वाहतूक पोलीस नियमाच्या नावावर कुणालाही कुठेही पकडून मारहाण करीत असल्याच्या घटना घडत आहे. शहरात कार्यरत असलेल्या चार्ली पथकाच्या एका शिपायाने डॉ. आंबेडकर जयंतीच्या दिवशी अमर माधव वानखेडे नामक युवकाला अशीच मारहाण केल्याचे या प्रकाराने उजेडात आले.
वाहतूक पोलिसांची युवकाला बेदम मारहाण
By admin | Updated: May 2, 2015 00:07 IST