अपघाताची शक्यता : बांधकामाला गती देण्याची मागणी वर्धा : वर्धा शहर ते बोरगाव(मेघे) या रस्त्याचे रूंदीकरण करण्यात येत आहे. याकरिता रस्ता खोदण्यात आला आहे. शिवाय रस्ता बांधकामाचे साहित्य रस्त्याच्या कडेला टाकण्यात आल्याने येथे वाहतुकीची कोंडी पाहायला मिळत आहे. बोरगाव (मेघे) ते वर्धा हा रस्ता अत्यंत वर्दळीचा असून येथून दिवसाला शेकडो वाहने धावतात. हाच रस्ता पुढे राळेगाव आणि हिंगणघाटकडे जातो. त्यामुळे महामंडळाच्या बसेस दिवसभर धावत असतात. याशिवाय खासगी प्रवासी वाहनांची संख्या मोठी आहे. शिवाय शाळा, महाविद्यालयांची संख्या अधिक असून विद्यार्थी याच रस्त्याने ये-जा करतात. त्यांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागतो. परिसरात मोठमोठे उद्योग असल्याने त्याकरिता लागणारा कच्चा माल घेऊन जाणारे वाहने याच रस्त्याने जातात. जडवाहनांमुळे या रस्त्याची दैना झाली आहे. या रस्त्याने धावणाऱ्या वाहनांची संख्या पाहता रस्त्याचे रूंदीकरण करण्याची मागणी होती. मागणीनुसार रस्ता रूंदीकरणाचे काम करण्यात येत आहे. खासगी प्रवासी वाहतुक करणारी वाहने रस्त्याच्या कडेला थांबविण्यात येतात. प्रवाशांना घेण्याकरिता व उतरविताना अनेकदा रस्त्यातच वाहने उभी करतात. त्यामुळे येथे वाहतुकीची कोंडी होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
रस्ता बांधकामामुळे वाहतूक प्रभावित
By admin | Updated: February 22, 2017 00:52 IST