लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अनेक गावांत भूमापन झाले नसल्यामुळे नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे, ही बाब लक्षात घेऊन ड्रोनद्वारे सर्वेक्षणाचा पथदर्शी प्रकल्प भूमी अभिलेख विभाग आणि जमाबंदी आयुक्त चोक्कलिंगम यांच्या संकल्पनेतून सर्व्हे आॅफ इंडियाच्या सहकार्याने राबविला जात आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील ८०८ गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.गावठाणाचे नगर भूमापन झालेले नसल्यामुळे नागरिकांना अडचणी येत आहेत. दोन मिळकतींमधील सीमेबाबत वाद असल्यास तो मिटवू शकत नाही. सीमेबाबत वाद किंवा तंटे न्यायालयात दाखल असतात. मात्र, त्या ठिकाणीसुद्धा मिळकतीचे नकाशे नसल्यामुळे निर्णय देताना जिकरीचे होते. नागरिकांना घर बांधणीसाठी अथवा वैयक्तिक कारणास्तव मिळकत तारण ठेवून कर्ज घ्यावयाचे असल्यास नगर भूमापन झाले नसल्यामुळे अधिकार अभिलेख उपलब्ध नसतो. परिणामी, बँका कर्ज देत नाहीत. नागरिकांना गावठाणातील जमिनी खरेदी विक्री करताना अडचणी निर्माण होऊ लागल्या. पारंपरिक पद्धतीने भूमापन करण्यात कित्येक वर्षे लागू शकतात. याकरिता ड्रोन सर्व्हेद्वारे नगर भूमापनाचा पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला.गावठाणाच्या जमिनीचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसतो, ही सर्वांत मोठी समस्या आहे. भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून या गावठाण क्षेत्राचे पुन्हा एकदा सर्वेक्षण होत असून जमिनीचे दस्तऐवज गोळा करण्याची सुरुवात अहमदनगर येथील रोहता तालुक्यात झाली. त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे सर्वेक्षण करण्यात आले. येथे हा उपक्रम यशस्वी ठरल्याने राज्यात ड्रोनद्वारे हे सर्वेक्षण केले जात आहे.भूमी अभिलेख विभागाच्या वतीने ईटीएसच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी गावठाणामध्ये अडचणी आढळून आल्याने सर्व्हेची गरज भासू लागली. यानुसार मूळ गावठाणाचा ड्रोनद्वारे सर्व्हे करून आखणी केली जाणार आहे.६१ कर्मचाऱ्यांची चमू कार्यरतवर्धा जिल्ह्यातील ८०८ गावांत सर्वेक्षण करण्यात येणार असून सेवाग्राम येथून या पथदर्शी प्रकल्पाला प्रारंभ झाला आहे. याकरिता हैदराबाद येथील सर्व्हे आॅफ इंडियाची चमू वर्ध्यात दाखल झाली आहे. सर्वेक्षणावेळी चौकशी अधिकारी मोक्यावर असणार आहेत. सर्वेक्षणानंतर प्रॉपर्टी कार्ड, सनद तयार होणार असून त्याची आॅनलाईन नोंद घेतली जाणार आहे. या प्रकल्पात तलाठी, ग्रामसेवक आणि गावकऱ्यांनादेखील सहभागी करून घेतले जाणार आहे. तलाठी, ग्रामसेवक आणि भूमी अभिलेखचे अधिकारी चुना आणि पेंटद्वारे आखणी करणार आहेत. याकरिता ६१ कर्मचाºयांची चमू कार्यरत आहे. धानोरा, रघुनाथपूर, आष्टा, भूगाव, जऊळगाव, मांडवगड, नेरी आदी ठिकाणी कामाला सुरुवात करण्यात आली. गुरुवारी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले.जेथे गावठाण आहे मात्र, त्याचा कुठलाही पुरावा नाही, अशा गावांत ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून त्याचा पुरावा तयार केला जाणार आहे. तालुक्यात अधिकारी, कर्मचाºयांच्या चमूमार्फत सर्व्हे आॅफ इंडियाच्या मदतीने हे काम केले जात आहे.- आनंद गजभिये, अधीक्षक, भूमी अभिलेख, वर्धा.भूमी अभिलेखविभागातील अधिकारी कर्मचारी या प्रकल्पांत रात्रंदिवस काम करीत असून शासनाने सोपविलेली जबाबदारी कर्मचारी पार पाडत आहेत. यात नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभागी होत सहकार्य करावे.-दिलीप गर्जे, अध्यक्ष, विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटना.
८०८ गावांत ड्रोनद्वारे नगर भूमापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:00 IST
गावठाणाच्या जमिनीचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसतो, ही सर्वांत मोठी समस्या आहे. भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून या गावठाण क्षेत्राचे पुन्हा एकदा सर्वेक्षण होत असून जमिनीचे दस्तऐवज गोळा करण्याची सुरुवात अहमदनगर येथील रोहता तालुक्यात झाली. त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे सर्वेक्षण करण्यात आले.
८०८ गावांत ड्रोनद्वारे नगर भूमापन
ठळक मुद्देमालमत्तेची होणार नोंदणी । भूमी अभिलेख खात्याचा पथदर्शी प्रकल्प