मोहन खेडकर : ‘व्हिलस्पिन’ या राष्ट्रीय तंत्रज्ञान कार्यशाळेला प्रारंभवर्धा : विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करुन भारताने यशाचे शिखर पादाक्रांत केले आहे. भारताने विकसित केलेले तंत्रज्ञान जगभरात पोहचते आहे. एवढी उत्तुंग झेप अद्यावत तंत्रज्ञानाने घेतली आहे. व्हिलस्पिनचे हे चक्र अद्ययावत ज्ञानाला गतीमान करणारे सशक्त माध्यम असून विद्यार्थ्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होईल. या ऊर्जेतूनच सशक्त भारताची निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन संत गाडगेबाबा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांनी केले. सेवाग्राम येथील बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीयस्तरीय टेकफेस्ट व्हिलस्पिनच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. एम.ए. गायकवाड, विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेचे संयोजक डॉ. एम.डी. चौधरी, कॉम्प्युटर विद्याशाखेचे संयोजक प्रा. सुधीर मोहोड, व्हिलस्पिन समन्वयक डॉ. आर.एस. मंगळुरकर, संयोजक प्रा. ए.एन. ठाकरे, विद्यार्थी संयोजक दिपंकर रॉय उपस्थित होते. डॉ. खेडकर म्हणाले, सराव हा आत्मविश्वासाचा पाया आहे. माहिती नसलेली एखादी गोष्ट आपण केली तर अपयश येईल ही नकारात्मक भावना आपल्याला नेहमी मागे खेचत असते. म्हणून प्रयत्नात सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा. मला नक्कीच जमेल ही विचारधाराच आपल्यातील सकारात्मक ऊर्जा वाढविते. व्हिलस्पिनची संकल्पना उलगडतांना ते म्हणाले की, रेल्वेचे सर्व चाक ही व्यवस्थित चालतात म्हणून ती निर्धारित स्थळी व्यवस्थित पोहचते. व्हिलचे स्पिनिंग योग्य असते म्हणून कुठलाही धोका संभवत नाही. यातील एक चाक जरी डगमगले तरी अपघात होतो. ज्ञानाच हे चक्र तुम्ही असेच संतुलित चालविल्यास नवनवीन ज्ञानाची उत्पती होईल. आपण यशही काबीज करू ते सहकार्यानेच. जगन्नाथ रथयात्रेचे त्यांनी यावेळी उदाहरण दिले. यानंतर डॉ. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमाने हे व्हिलस्पिन यशस्वी होत असून व्हिलस्पिन विद्यार्थ्यांना संशोधनाची दृष्टी, प्रोत्साहन देते असे सांगितले. येणाऱ्या सर्व आव्हानांना सामोरे जाण्यास विद्यार्थी सक्षम असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमात व्हिलस्पिनच्या चित्रफितीचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. मंगळुरकर यांनी दिवसभर चालणाऱ्या टेकफेस्टबद्दल माहिती दिली. व्हिलस्पिनचे अनावरण पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते झाले असून व्हिलस्पिन अंतर्गत एकूण २४ विविध उपक्रम आयोजित असल्याचे सांगितले. यामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. ज्ञानाच्या कक्षा रूदांवणार भक्कम व्यासपीठ म्हणजे व्हिलस्पिन असल्याचेही डॉ. मंगळुरकर म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन विराज भोयर व वैदही देशमुख यांनी केले. आभार प्रा. ए.एन. ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)
आजचा विद्यार्थीच उद्याचे प्रगत राष्ट्र निर्माण करेल
By admin | Updated: February 27, 2016 02:24 IST