वर्धा : केंद्र शासनाने २०१५ पासून संपूर्ण राज्यात ८० टक्के केरोसिनची कपात केली आहे़ यामुळे केरोसिनच्या वितरणात मोठी विसंगती निर्माण झाली आहे़ केरोसिन शिधापत्रिका धारकांना मिळणारे केरोसिन प्रतिकार्ड एक लिटरप्रमाणे मिळणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्हे मिळून केरोसिन विक्रेत्यांची संख्या सुमारे ५० ते ५५ हजार आहे. त्यांच्या ६ लाख कुटुंबावर या निर्णयामुळे उपासमारीची वेळ आल्याचा सूर चर्चासत्रात उमटला़जिल्हा केरोसिन हॉकर्स वेलफेअर असोसिएशन व अखिल भारतीय उपभोक्ता संघटन नवीन दिल्ली शाखा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्र घेण्यात आले़ अध्यक्षस्थानी दुर्योधन कावळे तर अतिथी म्हणून अशोक इंगोले, रूंदा भागवत आदी उपस्थित होते़ यावेळी केरोसिन विक्रेत्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. केरोसिन विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटित होऊन प्रयत्न करण्याचे आवाहन केले. वर्धा जिल्हा केरोसिन हॉकर्सचे अध्यक्ष विजय नरवडे यांनी केरोसिन पुरवठ्यामध्ये केलेली कपात केवळ वितरकच नव्हे तर सामान्यांसाठीही अन्यायकारक आहे़ यात गरिबांना केवळ एक लिटर रॉकेलमध्ये एक महिना काढावा लागणार आहे, असे सांगितले़ केंद्र व राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयावर व होत असलेल्या अन्यायाबाबत पूढील महिन्यात जिल्हा कार्यालयासमोर साखळी उपोषण, आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला़ यावेळी मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले़प्रास्ताविक अ़भा़ उपभोक्ता संघटन जिल्हाध्यक्ष बी.एस. माथनकर यांनी केले. संचालन विजय चावडे यांनी केले तर आभार जी.एम. ढोले यांनी मानले. कार्यक्रमास केरोसिन परवानाधारक व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)
केंद्राच्या निर्णयामुळे येणार सहा लाख कुटुंबांवर उपासमारीची वेळ
By admin | Updated: January 31, 2015 23:25 IST