मानधन अप्राप्त : कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषवर्धा : जिल्ह्यात सुमारे ५० मागासवर्गीय अनुदानित वसतिगृह कार्यरत आहेत़ या वसतिगृहामध्ये अंदाजे १ हजार ८०० मुले व मुली राहून शिक्षण घेत आहे़ मुलांच्या देखरेखीसाठी कार्यरत अधीक्षक, स्वयंपाकी, चौकीदार व मदतनिस असे १७३ कर्मचारी आहे़ या कर्मचाऱ्यांना गत पाच महिन्यांपासून मानधन देण्यात आलेले नाही़ यामुळे १७३ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांद्वारे करण्यात येत आहे़मागील दोन महिन्यांपासून समाज कल्याण कार्यालयात बीडीएस आले असताना समाज कल्याण कार्यालयाने कुठलीही कारवाई केली नाही़ समाज कल्याण कार्यालयात मानधनाबाबत कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता जिल्हा कोषागारामध्ये बिल पाठविले आहे, कोषागारातून बिल आल्यानंतर तुमचे मानधन देण्यात येईल, असे गत दोन महिन्यांपासून सांगितले जात आहे़ मागील पाच महिन्यांपासून मानधन न मिळाल्याने उपासमार होत आहे़ आजच्या महागाईच्या काळात १७३ मागासवर्गीय वसतिगृह कर्मचाऱ्यांना कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च, दवाखान्याचा खर्च कसा भागवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे़ मानधनच मिळत नसल्याने आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नसल्याच्या प्रतिक्रिया कर्मचारी देत आहेत़ येत्या आठ दिवसांत मानधन मिळाले नाही तर जि़प़ जिल्हा समाज कल्याण कार्यालयात सर्व कर्मचारी आत्महत्या करतील, असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला आहे़ याची जबाबदारी जिल्हा समाज कल्याण कार्यालय जि़प़ वर्धा यांची राहिल, असेही महा़ राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेने निवेदनात नमूद केले आहे़ या प्रकरणी त्वरित कारवाई करण्याची मागणी संघटनेने केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
१७३ कुटुंबांवर उपासमारीची वेळ
By admin | Updated: July 27, 2014 23:54 IST