सावंगी ग्रा.पं.तील कागदपत्रात खोडतोड प्रकरण वर्धा: सावंगी (मेघे) ग्रामपंचायतीतील तत्कालीन सरपंच व ग्रामसचिवाने जमिनीच्या कागदपत्रात खोडतोड करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी येथील सामाजिक कार्यकर्ता मुरारका यांनी सेवाग्राम पोलिसात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून तपास सुरू असताना गुन्हा दाखल असलेल्या तिनही आरोपींनी न्यायालयातून सशर्त जामीन मंजूर केला होता. यावर गुरुवारी अंतिम सुनावणी झाली असता न्यायालयाने सरपंच उमेश जिंदे, ग्रामसचिव हरिदास रामटेके व संजय मोरे या तिघांचा जामीन नाकारला. हा निकाल येथील न्यायाधीश अनिरूद्ध चांदेकर यांनी दिला. ग्रामसचिवावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या विरोधात वर्धेत ग्रामसेवकांनी आंदोलन पुकारले होते. पोलीस प्रशासनाच्यावतीने चौकशी केली असता प्रकरणातील सत्यता उघड झाली. यामुळे पोलिसांनी तपासाकरिता या तिघांनाही ताब्यात घेण्याची गरज असल्याचा अर्ज न्यायालयात सादर केला होता. यावर आज न्यायालयात सुनावणी झाली असता त्यांचा जामीन नामंजूर करण्यात आला. या तिघांना अटक करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)
‘त्या’ तिघांचाही जामीन नाकारला
By admin | Updated: April 8, 2016 01:53 IST