लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनमुळे देशात सर्वच प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद केल्यामुळे जिल्ह्यातील नागरिक बाहेर राज्यासह इतर जिल्ह्यात अडकून पडले आहेत. इतर राज्यात व जिल्ह्यात अडकून पडलेल्या वर्धा जिल्ह्यातील नागरिकांनी तेथील जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावी. तसेच वर्धा जिल्ह्यात अडकलेल्या इतर राज्यातील व जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केले आहे.कोरोना संसर्गासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्र शासनाने देशात लॉकडाऊन केले. सर्व प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद केली. त्यामुळे अनेक नागरिक आहे त्याच ठिकाणी अडकून पडले. तसेच आपल्या जिल्ह्यातही इतर राज्यातील व जिल्ह्यातील कामगार, विद्यार्थी, पर्यटक अडकून पडले आहेत. प्रत्येक जिल्हा प्रशासन त्यांच्या जिल्ह्यात अडकलेल्या आणि परत त्यांच्या स्वगावी जाण्यास इच्छूक नागरिकांची यादी तयार केल्या जात आहे.वर्धा जिल्ह्यातील किती नागरिक इतर राज्यात व जिल्ह्यात अडकले आहेत, तसेच वर्धा जिल्ह्यात इतर जिल्हे व राज्यातील किती नागरिक अडकले आहेत याची माहिती संकलित करण्याचे युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी नागरिकांनी त्यांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात फोनद्वारे संपर्क करून द्यावी. अर्जात संपूर्ण नाव, पत्ता, अडकलेल्या ठिकाणाचा पत्ता, संपर्क क्रमांक आदी महत्त्वाची माहिती नमूद करावी. तसेच ज्या जिल्ह्यातून प्रवास करावयाचा आहे, त्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्याकडे प्रवासाच्या परवानगीसाठी अर्ज करावा. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करताना करावयाच्या प्रक्रियेबाबत त्यांना सविस्तर माहिती संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात येईल. वर्ध्यातून बाहेर जाणाऱ्या नागरिकांसाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार तर बाहेरून वर्ध्यात येणाऱ्या नागरिकांसाठी उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या सर्व कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे यांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरिकांना त्यांची माहिती प्रशासनाला कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत आहे. मागील महिनाभरापासून अनेक नागरिक जिल्ह्याबाहेर अडकून पडले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत आहे.प्रवास तिकिटांसाठी पैसेच नाहीलॉकडाऊनमुळे कुणी निवारगृहात तर कुणी आहे त्याच झोपडीत अडकून राहिले आहे. महिनाभरापासून हाताला काम नाही. अनेकांकडे होते तेवढे पैसे संपले आहे. अशा स्थितीत प्रशासनाकडून अडकलेल्यांना जिल्ह्यात आणण्यासाठी धडपड सुरू केली आहे. गावी जाणाऱ्यांना परतीच्या प्रवासाचा खर्च करावा लागणार आहे. मग, तिकीटांसाठीचा हा खर्च कुठून करणार, असा प्रश्न अडकलेल्या कामगारांना पडला आहे. जवळ असलेले पैसे अनेकांनी आॅनलाईन पाठविले. अनेकांचे पैसे गाव गाठताना वाटेतच खर्च झाल्याने खिसे रिकामे झाले आहेत. तिकिटाएवढेही पैसे कामगारांकडे असतील याबाबत साशंकताच आहे. त्यामुळे शासनाने याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
अडकलेल्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST
वर्धा जिल्ह्यातील किती नागरिक इतर राज्यात व जिल्ह्यात अडकले आहेत, तसेच वर्धा जिल्ह्यात इतर जिल्हे व राज्यातील किती नागरिक अडकले आहेत याची माहिती संकलित करण्याचे युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी नागरिकांनी त्यांची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात फोनद्वारे संपर्क करून द्यावी. अर्जात संपूर्ण नाव, पत्ता, अडकलेल्या ठिकाणाचा पत्ता, संपर्क क्रमांक आदी महत्त्वाची माहिती नमूद करावी.
अडकलेल्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा
ठळक मुद्देलॉकडाऊन इफेक्ट : जिल्हाधिकारी भिमनवार यांचे आवाहन