वर्धा : धावसा (हेटी) येथील दोन बालके २२ फेबु्रवारीपासून बेपत्ता होती़ दोन दिवसांनी त्यांचे मृतदेह पाझर तलावात पाण्यावर तरंगताना आढळले़ यावरून पाण्यात बुडून बालकांचा मृत्यू झाल्याची नोंद कारंजा पोलिसांनी केली; पण दोन्ही बालके पाण्यात बुडून नव्हे तर विजेचा धक्का लागल्याने मरण पावली, असे मत पालकांनी व्यक्त केले़ याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांना निवेदन सादर केले़ यात बालकांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे़ २२ फेब्रुवारी रोजी शैलेश मालजी करनाके (१४) आणि मोरेश्वर अनंता वझरकर (१२) ही दोघेही हरविल्याची तक्रार कारंजा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती़ यानंतर दोन दिवसांनी म्हणजे २४ फेबु्रवारी रोजी सकाळी ७ वाजता दोन्ही बालकांचे मृतदेह गावाजवळील पाझर तलावामध्ये आढळून आले़ त्यावेळी मालजी करनाके व अनंता वझरकर यांची मन:स्थिती बरोबर नव्हती़ दोन्ही मुले तलावात बुडून मरण पावली असावी, असेच सर्वांना वाटले; पण २५ फेब्रुवारीपासून गावात विद्युतचा धक्का लागल्याने दोन्ही बालकांचा मृत्यू झाल्याची चर्चा गावात होती़ शिवाय दोन्ही बालकांचे मृतदेह दोन दिवस व दोन रात्री गव्हाच्या शेतात लपवून ठेवले व सोमवारी रात्री तलावात आणून टाकल्याचा संशय मृत बालकांच्या पालकांनी निवेदनातून व्यक्त केला आहे़ गावाला लागूनच असलेल्या शेतात नेहमीच शेतामध्ये धुऱ्याने तार लावून विद्युत प्रवाह सोडला जात असल्याची गावात चर्चा आहे़ यावरून दोन्ही बालकांचा मृत्यू तलावात बुडून नाही तर शेतातील विद्युत प्रवाहित ताराला स्पर्श झाल्याने झाला व त्यांचे मृतदेह नंतर पाझर तलावात टाकले असावे, असा संशय पालकांनी व्यक्त केला आहे़ अत्यंसंस्काराच्या वेळी मुलांचे चेहरे व अंग पूर्ण काळे पडले होते़ यामुळे हा घातपाताचा प्रकार असावा, अशी शंकाही उपस्थित करण्यात आली आहे़ या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी, शवविच्छेदन अहवाल पुन्हा तपासावा व पोलिसांना चौकशीचे आदेश द्यावे, अशी मागणी मालजी करनाके व अनंता वझरकर यांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
‘त्या’ बालकांचा पाण्यात बुडून नव्हे तर विजेचा धक्का लागून मृत्यू
By admin | Updated: March 15, 2015 02:00 IST