पालिकेचे दुर्लक्ष : ये-जा करताना नागरिकांना काटे बोचण्याची भीतीवर्धा : शहरातील शिवाजी पुतळा ते बजाज चौक या मुख्य रस्त्याच्या सौंदर्यीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला आहे. त्यातच रस्त्यावरील दुभाजकांवर सध्या काटेरी झाडांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुख्य दुभाजकाचे सौंदर्यीकरण न झाल्यामुळे या रस्त्यावर आधीच अवकळा पसरली आहे. निरनिराळ्या झुडपी झाडांना केवळ डोकेच वर काढलेले नाही तर ती अवाढव्य वाढली आहे. विशेष म्हणजे या झाडांसोबतच अनेक ठिकाणी काटेरी झाडे वाढली आहे. लोखंडी कठड्यांमधून या झाडांच्या काटेरी फांद्या पसरत चालल्या आहेत. या मार्गावर दिवसभर वर्दळ सुरू असते. यावेळी ये-जा करताना नागरिकांना या काटेरी फांद्या बोचत असतात. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले असून पालिकेने सफाई करावी अशी मागणी होत आहे. दुभाजकांची सफाई करणे, त्यातील तण व वाढत चाललेली मोठी झाडे कापणे आदी कामे नियमित करणे गरजेचे आहे. शहरातील मुख्य रस्ता असल्याने तो आकर्षक असावा अशी सामान्यांची स्वाभाविक अपेक्षा आहे. महिनोंमहिने या दुभाजकांची स्वच्छताच होत नाही. त्यामुळे काही झाडे मोठी होऊन ये जा करीत असलेल्या नागरिकांना बरेचदा समोरचा रस्ताच दिसत नाही. त्यातच वाढलेल्या काटेरी झाडांमुळे त्रासात वाढ होत आहे. दुभाजकांवरील लोखंडी कठडे अनेक ठिकाणी बाहेरच्या बाजूने वाकले आहेत. त्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात घडले आहेत. ही सर्व परिस्थिती असतानाही नगर पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यातच या काटेरी झाडांमुळे जनावरांचा मुक्त संचार सर्वत्र रस्त्यांवर सुरू असतो. त्यामुळेही अपघात होतात. तसेच वाहतुकीचाही खोळंबा होतो. त्यामुळे या काटेरी झाडांची पालिकेच्या वतीने सफाई करण्याची मागणी प्रवासी व नागरिकांद्वारे होत आहे.(शहर प्रतिनिधी)
दुभाजकांवर काटेरी झाडांचा विळखा
By admin | Updated: October 8, 2015 01:52 IST