चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, याकरीता शिक्षण विभागाकडून नेहमीच प्रयत्न केले जातात. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडागुणही विकसित करण्याकरीता शाळा, महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांकडे मैदाने असणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील सुमारे ९०६ शाळा, महाविद्यालय, प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना स्वत:चे क्रीडांगण नसल्याने येथील विद्यार्थ्यांना खेळण्यापासून वंचित तर राहावे लागत आहे.जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय अशा एकूण १ हजार २४८ शाळा आहेत. यापैकी केवळ ३४२ शाळांकडे मैदाने आहेत तर तब्बल ९०६ शाळा, महाविद्यालय, शाळांकडे मैदान नाही. त्यामुळे या शाळांतील विद्यार्थ्यांना खेळापासून वंचित राहावे लागत आहे. विशेष म्हणजे, क्रीडांगण नसतानाही या शाळांवर शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार शाळांमध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणे शाळा व्यवस्थापनावर बंधनकारक आहे. शाळांकरीता वर्गखोल्या, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, संरक्षक भिंत, उताराचा रस्ता, खेळाचे मैदान आदी मुलभूत सुविधांबाबतचे निकष आहेत. मात्र, यातील मैदानाच्या निकषाची पूर्तता करताना अनेक शाळांनी पळवाट शोधून, कायद्याच्या चौकटीतून आपली सुटका करुन घेतली आहे.भाडेतत्त्वावर व मोकळ्या जागांचे करार करून, अशा जागा खेळासाठी मैदान म्हणून वापरत असल्याचे अनेक शाळांनी दाखविले आहे. प्रत्यक्षात स्वमालकीच्या जागा असलेल्या शाळांची संख्या कमी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शाळांकडे मैदान नसल्यामुळे जिल्ह्यातील शाळा शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचे स्पष्ट होत आहे.यामुळे जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीला बाधा पोहोचविण्याचेही काम या शिक्षण संस्था करीत असल्याने त्या संस्थांची तपासणी करुन त्यांना क्रीडांगणे उपलब्ध करुन देणे बंधकारक करण्याची मागणी क्रीडाप्रेमींकडून होत आहे.११७ शाळांच्या क्रीडांगणास कुंपणाचा अभावजिल्ह्यात एकूण ३४२ शाळा, महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, उच्च प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आदींकडे स्वत:ची मैदाने आहेत पण; या मैदानामध्ये तब्बल ११७ शाळेतील मैदानांना कुंपण नाही. त्यामुळे विद्यार्थी खेळाडूंना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.असे असावे मैदान...राष्ट्रीय भवन निर्माण संहिता २००५ नुसार अवघी ५०० विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये जागेच्या उपलब्धतेनूसार क्रीडांगणाचे क्षेत्र दोन हजार चौरस मीटर असावे. विद्यार्थी संख्या कमी असल्यास १८ मीटर बाय ३६ मीटरचे, म्हणजेच ६४८ चौरस मीटर इतके किमान क्षेत्रफळ असावे.उसनी मैदानेजिल्ह्यात माध्यमिक शाळांची संख्या १९७ असून यापैकी अनेक शाळांकडे स्वत:चे मैदान नाही. स्वत:चे मैदान नसलेल्या शाळांनी शिक्षण हक्क कायद्यातून पळवाट शोधून भाडेतत्त्वावर तर काहींनी मोकळे मैदान दाखवून ‘हे आमचेच’ असा अहवाल प्रशासनाला सादर केला आहे. उसनी मैदाने घेतलेल्या शाळांची सविस्तर माहिती मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाकडे नाही. त्यामुळे स्वत:चे मैदान नसलेल्या शाळांचा आकडाही खुप मोठा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
९०६ शाळा, महाविद्यालयांमध्ये क्रीडांगणच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 06:00 IST
जिल्ह्यात प्राथमिक व माध्यमिक शाळा, महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय अशा एकूण १ हजार २४८ शाळा आहेत. यापैकी केवळ ३४२ शाळांकडे मैदाने आहेत तर तब्बल ९०६ शाळा, महाविद्यालय, शाळांकडे मैदान नाही. त्यामुळे या शाळांतील विद्यार्थ्यांना खेळापासून वंचित राहावे लागत आहे. विशेष म्हणजे, क्रीडांगण नसतानाही या शाळांवर शिक्षण विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
९०६ शाळा, महाविद्यालयांमध्ये क्रीडांगणच नाही
ठळक मुद्देविद्यार्थी खेळापासून वंचित : शिक्षण संस्थांनी दडवली माहिती