प्रफुल्ल लुंगे सेलूग्रामीण उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा महात्मा गांधी यांनी संदेश दिला आहे. त्यांच्या तत्त्वावर सुरू असलेल्या मगन संग्रहालयाच्यावतीने येथे सूतकताईतून महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सेलू येथे सध्या दहा सौर उर्जेवर चालणारे व १५ हाताने चालविल्या जाणाऱ्या चरख्यावर सूतकताई होत आहे. हा रोजगार २५ महिलांना एकाचवेळी उपलब्ध झाला आहे. या रोजगारातून तालुक्यातील आणखी महिलांना आत्मनिर्भर करण्याचा त्यांचा मानस असल्याचे सांगण्यात आले आहे. सेलू येथे माहेर मंगल कार्यालयासमोर अंबर चरखा कताई आणि विणाई केंद्र आहे़ येथे या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात डॉ़ विभा गुप्ता यांच्या महिलांविषयी असलेल्या तळमळीतून करण्यात आली आहे़ त्यामुळे पहिल्या टप्प्यात २५ महिलांच्या हाताला काम मिळून त्यांना सन्मानाने जगण्याची उमेद मिळाली आहे़ येथे परितक्ता महिलांना विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. त्यांची उपलब्धता कमी असल्यास गरजवंतांना येथे काम दिले जाते़ हे काम पुढे अनेकांच्या सहयोगातून वाढविण्याचा मगन संग्रहालय समितीचा प्रयत्न आहे़ रोज ५० गुंड्यांची कताई हाताने चालविल्या जाणाऱ्या चरख्यावर एका गुंडीसाठी ४.५० रुपये तर सौर उर्जेवर चालणाऱ्या चरख्यावर एका गुंडीसाठी ३.५० रुपये असा मजुरीचा दर निर्धारित करण्यात आला आहे. यात एका दिवसाला या महिलांकडून महिला किमान ५० गुंड्या सूतकताई होते. यात त्यांना १५० ते १७५ रुपयांपर्यंत मजुरी येत आहे. सेंद्रिय कापूस उत्पादकांकडून कापूस घेण्याचा प्रयत्न जिल्ह्यातील संबंधित सेंद्रीय कापूस उत्पादकांकडून कापूस घेतल्या जातो. कापूस कमी पडत असल्यास मध्यप्रदेश, कर्नाटक, राजस्थान येथूनही तो आणण्याचा प्रयत्न आहे. महात्मा गांधींच्या चरख्याला गतवैभव येणारखादीचा कापड घालण्याचा अनेकांना मोह आवरता येत नाही़ मात्र अतिशय कठीण प्रक्रियेतून तो तयार होतो हे बऱ्याच जणांना ठावूक नाही. लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट वर्धा, बजाज फाऊंडेशन आदींच्या सौजन्याने अधिक चरखे उपलब्ध करून ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न यापुढे केल्या जाणार आहे़ त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना रोजगाराची संधी मिळेल व चरख्यावर सूतकताईचे तुटत चाललेले अलिकडील काळातील संबंध अधिक घट्ट होवून महात्मा गांधीच्या या उपक्रमाला पुन्हा गतवैभव प्राप्त झाल्याचे दिसेल़
सूतकताईतून २५ महिला झाल्या आत्मनिर्भर
By admin | Updated: January 10, 2015 01:49 IST