लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी तालुक्यातील हिरवा तांडा येथे जिल्ह्यातील पहिल्या कोविड बाधिताची नोंद घेण्यात आली असली तरी शनिवारपर्यंत जिल्ह्यात ५ लाख २ हजार ८९५ व्यक्तींची कोविड चाचणी केली असता ५५ हजार ४६० व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे सध्या कोविडची तिसरी लाट जिल्ह्यात उच्चांक गाठत असून दररोज मोठ्या संख्येने नवीन काेविड बाधित जिल्ह्यात सापडत आहेत. आतापर्यंत आरटीपीसीआर आणि ॲंटिजन पद्धतीने कोविड चाचणीसाठी जिल्ह्यात ५ लाख २ हजार ९९५ किटचा वापर झाला असला तरी सध्या आरटीपीसीआर टेस्टसाठी ७० हजार व्हीटीएम किट तर ॲंटिजन पद्धतीने कोविड चाचणीसाठी ७९ हजार किट आरोग्य यंत्रणेकडे शिल्लक आहेत. जिल्ह्यात सध्या काेविड चाचण्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे.
कोविड चाचणीसाठी १.४० लाख किट शिल्लक- जिल्ह्यात सध्या दररोज हजाराहून अधिक व्यक्तींची कोविड चाचणी केली जात असून सध्या जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेकडे सुमारे १ लाख ४० हजार कोविड चाचणी किट असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शासकीय कोविड टेस्ट सेंटरला या किटचा पुरवठा होतो.
जिल्ह्यात २,८३९ ॲक्टिव्ह कोविड बाधित- जिल्ह्यात सध्या कोविडची तिसरी लाट उच्चांक गाठत असून जिल्ह्यात सध्या २ हजार ८३९ सक्रिय कोविड बाधित आहेत. या सक्रिय रुग्णांवर आरोग्य विभागाचा बारकाईने वॉच असून त्यांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
कोरोनाने घेतला १,३३५ व्यक्तींचा बळी- जिल्ह्यातील ५१ हजार ३३२ व्यक्तींनी कोविडवर विजय मिळविला असला तरी कोरोनामुळे जिल्ह्यातील १ हजार ३३५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. एकूणच कोरोना हा जीवघेणा आजार असल्याने प्रत्येक नागरिकाने दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची गरज आहे. तसे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.