ढगाळ वातावरण : महागड्या फवारणीचा भुर्दंडआर्वी : गत पंधरवड्यापासून असलेल्या ढगाळ वातावरणाचा फटका तुरीला बसला आहे. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर मोठ्या प्रमाणावर अळ्यांचा प्रकोप पहावयास मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. यावर कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. आर्वी तालुक्यातील वाठोडा, वागडा, अल्लीपूर, खुबगाव, सर्कसपूर, लाडेगाव, मांडपूर, बाजरवाडा, दहेगाव, निबोंली (शेंडे), देऊरवाडा, जळगाव, टाकरखेडा, परतोडा, वर्धमनेरी, वाढोणा, गुमगाव, पिंपळखुटा आदी गावांसह इतरही गावांतील शेत शिवारात अळ्यांचा प्रकोप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याचा फटका तूर उत्पादकांना सोसावा लागणार असल्याचे बोलल्या जात आहे. यावर आळा घालण्यासाठी शेतकरी सध्या शेतात फवारणी करीत आहे. पण त्याचा तितकासा उपयोग होत नसल्याचेही सांगण्यात येत आहे. पंधरवड्यापासून आर्वी तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. हे वातावरण तुरीवरील अळ्यांसाठी पोषक असते. दिवाळीपुर्वी फुलाने बहरलेल्या तुरीला स्वच्छ उन्हाची गरज असते. परंतु त्याच दरम्यान ढगाळ वातावरण सतत राहिल्याने तूर पिकावर अळ्यांचा प्रकोप वाढायला सुरुवात झाली आहे. यावर्षी तूर पिकाचे दर हे १३ हजारापर्यंत गेले. ओलीताची सोय असलेले शेतकरी नगदी पीक म्हणून तूर पिकाकडे बघतात. यावर्षी कपाशीचे पीक समाधानकारक नसल्याने व त्यातही कापसाचा भाव चार हजाराच्या वर जात नसल्याने शेतकरी आधीच आर्थिक विवंचनेत आहे. त्यातच तूर पिकांवर अळ्यांचा प्रकोप आल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळात तेरावा महिना साजरा करीत महागडी औषध फवारणीची वेळ आली आहे. सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणावर कृषी केंद्रातून तूर पिकावर फवारणीचे औषध घेत आहे. मागील वर्षी तूरीला पिकाला समाधानकारक भाव मिळाल्याने यावर्षीही त्यांनी या पिकावर लक्ष केंद्रीत केले. परंतु त्यालाही ढगाळ वातावरणाचा फटका बसल्याने शेतकऱ्यांना त्याचा चांगलाच फटका बसत आहे. वातावरणातील बदल व नोव्हेंबर महिना अर्धा होऊनही थंडी न वाढल्याने याचा दुष्परिणाम तूर पिकावर झाल्याचे बोलल्या जाते. कृषी विभागाने यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.(तालुका प्रतिनिधी)
तुरीवर अळ्यांचा प्रकोप
By admin | Updated: November 16, 2015 00:41 IST