प्रशासनाला दिली न्यायालयाच्या निर्णयाची माहिती वर्धा : शिक्षकांना लोकसंख्या नोंदवहीच्या कामाकरिता सक्ती करून नये असा न्यायालयाचा आदेश आहे. असे असताना या कार्याबद्दल काही शाळांत सक्ती होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाला न्यायालयाच्या आदेशाची माहिती होण्याकरिता वर्धा जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावाडकर यांना शनिवारी निवेदन सादर केले. या निवेदनासह न्यायालयाच्या आदेशाची प्रतही त्यांना देण्यात आली. शासनाच्यावतीने लोकसंख्या नोंदवह्या अद्ययावत करण्यात येत आहे. सदर कामाकरिता शिक्षकांची निवड करण्यात आली होती. मात्र सदर अशैक्षणिक काम करण्यास शिक्षकांकडून विरोध दर्शविण्यात आला होता. या संदर्भात राज्य स्तरावर शिक्षक संघटनांनी एकत्र येत न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयाने शिक्षकांना या कामाची सक्ती करू नये असा निर्णय दिला. मात्र त्याची जिल्हा प्रशासनाला माहिती नसल्याने या कामाची सक्ती सुरूच असल्याने त्याची माहिती होण्याकरिता निवेदन देण्यात येत असल्याचे समन्वय समितीच्यावतीने कळविण्यात आले आहे. निवदेन देतेवेळी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
एनपीआर विरोधात शिक्षकांचे निवेदन
By admin | Updated: October 18, 2015 02:24 IST