गैरव्यवहार प्रकरण : ग्रामस्थांचा सीईओंना १५ दिवसांचा अल्टिमेटमवर्धा : तळेगाव (टा.) ग्रामपंचायतमध्ये झालेल्या विविध विकास कामांतील कथित गैरव्यवहार प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करावी, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी ग्रामस्थांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीना यांना दिले. येत्या १५ दिवसांत ही कार्यवाही न झाल्यास जिल्हा परिषदेत आमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. सदर प्रकरण दडपण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा दबाब वाढत असल्याची चर्चा असताना दुसरीकडे ग्रामस्थांची कार्यवाहीसाठीची भूमिका यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी चांगलेच कात्रीत सापडले आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावला आहे. सात दिवसांत त्यांना उत्तर सादर करावयाचे आहे. त्यांची भूमिका लक्षात घेऊनच पुढील कार्यवाही करणार असल्याची सीईओ संजय मिना यांनी दिल्याचे शिष्टमंडळाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अशातच पुन्हा ग्रामस्थांनी पुढील कार्यवाहीसाठी सीईओंना निवेदन सादर केल्यामुळे प्रकरणही गंभीर वळण घेत आहे. शिष्टमंडळात वर्धा बाजार समिती उपसभापती पांडुरंग देशमुख यांच्यासह प्रशांत वंजारी, देविदास सूरकार, ग्रा.पं. सदस्य सुभाष तपासे व दिनेश उडे, गोविंदा कोपरकर यांच्यासह २४ जणांचा समावेश होता.(कार्यालय प्रतिनिधी)
तळेगाव ग्रा.पं. वर कायदेशीर कार्यवाही करा
By admin | Updated: August 28, 2015 02:03 IST