मिलिंद सोनोने : मातोश्री वृद्धाश्रमात मातृ-पितृ ॠण कार्यक्रमवर्धा : मनुष्य शिक्षणाने ज्ञानसंपन्न, संस्कारित व विवेकवादी होतो अशी सर्वसामान्यांची धारणा आहे. परंतु वृद्धाश्रमात वृद्धांकडे पाहिल्यानंतर मनाला वेदना होतात. तेव्हा प्रत्येक मनुष्याने आई-वडिलांना घरातील ऊर्जास्थळ समजून त्यांची काळजी घावी, असे विचार सामान्य रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मिलिंद सोनोने यांनी व्यक्त केले.स्थानिक सिंदी (मेघे) येथे मातोश्री वृद्धाश्रमात किरण पटेवार व मित्र परिवाराद्वारे आयोजित मातृ-पितृ ऋण समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नाट्य दिग्दर्शक हरीश इथापे, वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा पुष्पलता देशमुख, मंगेश अमुदरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. धुर्वे, चंदन बोरकर, सविता ढोले व शिवकुमार निलेवार यांची उपस्थिती होती.गत तीन वर्षापासून स्व. लक्ष्मणराव व स्व. वच्छलाबाई पटेवार स्मृतिप्रीत्यर्थ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. वृद्धांना आपल्या पोटचा गोळा समजून त्यांच्याशी जिव्हाळ्याने वागण्याचा सल्ला इथापे यांनी आपल्या भाषणात दिला. याप्रसंगी शामराव आनपान यांना समाजगौरव तर अर्चना गुप्ता व माधुरी माहुलकर यांचा आदर्श नारी गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. वृद्धाश्रमात मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात यावी, अशी मागणी किरण पटेवार यांनी डॉ. सोनोने यांना केली. यावर सोनोने यांनी तत्काळ दर गुरवारला आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले. उपस्थितांनी सहा हजार रुपये रक्कम गोळा करून वृद्धाश्रमाला आर्थिक सहकार्य केले. प्रास्ताविक किरण पटेवार यांनी केले. संचालन ममता कुंभारे यांनी तर आभार अजय गुप्ता यांनी केले. कार्यक्रमाला सर्वश्री चव्हाण, विठ्ठल गुल्हाणे, संजय तिळले, भास्कर नेहारे, शंकर तिखे, अनिल घिमे, दीपाली पटेवार, रागिणी पटेवार उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
आई-वडिलांना ऊर्जास्थळ मानून त्यांची काळजी घ्या
By admin | Updated: October 15, 2014 23:22 IST