युवासेनेची पोलिसात तक्रार : इंद्रायणी इन्स्टिट्युटमधील प्रकारसमुद्रपूर : येथील इंद्रायणी टेक्निकल इन्स्टिट्युट या संस्थेने औद्योगिक प्रशिक्षण संस्था असल्याचे भासवून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी देत वीस हजार रूपयांपर्यंत प्रवेश शुल्क आकारले. परंतु संस्था बोगस असल्याचे लक्षात येताच शिवसेना प्रणित युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करीत संंबंधित संस्थेवर कारवाई करण्याची मागणी केली. समुद्रपूर शहरात मागील वर्षी रमेश डगवार यांच्या घरी इंद्रायणी टेक्निकल इन्स्टिट्युट या संस्थेने आयटीआयचा फलक लावला. तब्बल १०३ विद्यार्थ्यांना पंधरा ते वीस हजार रूपये प्रवेश शुल्क आकारून इलेक्ट्रिशीयन, फीटर, डिझेल मॅकेनिक या ट्रेडला प्रवेश दिला. मुळात संस्थेला क्यूसीआय क्वॉलिटी कॉन्सिल आॅफ इंडिया, डीजीएनटी डायरेक्ट्रोरेट जनरल आॅफ ट्रेनिंग, एनसीव्हीटी नॅशनल कौन्सिल आॅफ व्होकेशनल ट्रेनिंग आणि डीव्हीईटी व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग बोर्ड महाराष्ट्र या नामांकित संस्थेपैकी कुणाकडेही नोंदणी केली नसल्याचा आरोप तक्रारीत आहे. काहींना दोन वर्षांचा अभ्यासक्रम एकाच वर्षात करून देतो म्हणून सांगितल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. संस्थेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी पुण्यातील नामांकित कंपन्यांमध्ये अर्ज दाखल केला असता तेथील प्रशासनाने या संस्थेचे प्रमाणपत्र चालत नसल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी संस्था प्रशासनाला जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. संतप्त विद्यार्थ्यांनी युवासेनेमार्फत पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार नोंदविली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र लढी, नितीन सरोदे, प्रमोद भटे, पंकज ताटकर, संजय कोरडे, मांडवकर, अभिलाष गिरडकर, कुणाल बोधे, शुभम अवघडे, करपे, अक्षय फुकट, किरण जवादे, कलोडे, धोटे उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)इंद्रायणी टेक्निकल इन्स्टिट्युट या संस्थेला आॅल इंडिया टेक्निकल एज्युकेशन, मुंबई (एआयटीईएम) ची मान्यता आहे. सदर संस्था मान्यताप्राप्त आहे. आम्ही कुणाचीही फसवणूक केलेली नाही.- संदेश निंबाळकर, संचालक, इंद्रायणी टेक्निकल इन्स्टिट्युट, समुद्रपूर
आयटीआयच्या नावे फसवणूक करणाऱ्या संस्थेवर कारवाई करा
By admin | Updated: August 24, 2016 00:25 IST