बोरधरण येथील विनयभंग प्रकरण : बलात्काराच्या तक्रारीही पुढे येण्याची शक्यतासेलू: बोरधरण परिसरातील एका हॉटेलात जेवणासाठी मित्रासोबत गेलेल्या एका तरूणीचा पोलीस उपनिरीक्षक राजू चौधरी याने विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस ठाण्यातून तो फरार झाला. तर जीप चालक नीलेश मेश्रामला अटक करण्यात आली. विशेष न्यायालय वर्धा यांच्या आदेशाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तसेच या प्रकरणात हयगय केल्याप्रकरणी आरोपींसह पोलीस हवालदार दिनेश पांडे व एएसआय अशोक चांभारे अशा चौघांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मंगळवारी निलंबित केले आहे.पोलीस खात्याच्या ‘सद्रक्षणाय, खलनिग्रणाय’ या ब्रीदवाक्यास कलंकित करणारा प्रकार पोलीस उपनिरीक्षक व चालकाने केल्याने या घृणास्पद प्रकरणाची सर्वत्र निंदा होत आहे. उपनिरीक्षक चौधरी व जीप चालक मेश्राम या विकृत मानसिकतेच्या वर्दीतील नराधमांनी या परिसरात येणाऱ्या अनेक तरूणींना वासनेचे शिकार केल्याची चर्चा आहे. बदनामीपोटी अनेक तरुणींनी आतापर्यंत तक्रार केली नसल्याचेही बोलल्या जात आहे. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर अनेक अन्यायग्रस्त तरूणी पुढे येण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. पोलीस उपनिरीक्षक चौधरी व मेश्राम हे या परिसरात नियमित जात होते. या परिसरात तरूण-तरूणी येण्याचे वाढते प्रमाण दोघांसाठी एक व्यवसायच झाला होता. कारवाई व बदनामीचा धाक दाखवून अनेकांचे मोबाईल व नगदी रक्कम तो हिसकावत असल्याचे स्थानिक सांगत आहेत. त्यामुळे त्याच्याकडे जवळपास पन्नासपेक्षा जास्त मोबाईल हॅन्डसेट असतील, अशी चर्चा आहे. भीतीपोटी कुण्याही प्रेमीयुगलांनी तक्रार केली नाही. मात्र एका तरूणीने दाखविलेल्या धाडसामुळे वर्दीतला नराधम समाजापुढे आल्याचे बोलल्या जात आहे.(तालुका प्रतिनिधी)
उपनिरीक्षक व चालकासह चौघे निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2015 02:14 IST