लोकमत ‘स्टिंग आॅपरेशन’ने खळबळ : कारवाईकडे गावकऱ्यांचे लक्षआकोली : या परिसरातील अंगणवाडीचे वास्तव मंगळवारी ‘लोकमत’च्या ‘स्टिंग आॅपरेशन’च्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समोर आले. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली. या भागातील अंगणवाड्यांची पाहणी जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मबाक) एस.एन. मेसरे यांनी केली. त्यांनी अहवालही सादर केला. आता या अहवालावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अंगणवाडीतील अनागोंदी कारभार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला. पटावर दिसणारी बालके प्रत्यक्ष अंगणवाडीत नाहीत. या रिकाम्या अंगणवाड्यांचे सचित्र वास्तव प्रशासनापुढे मांडले. गत कित्येक महिन्यांपासून बालकांची आरोग्य तपासणी सुद्धा झाली नसल्याची माहिती आहे. केवळ कागद पांढऱ्याचे काळे करून आरोग्य तपासणीचा केलेल्या बनावावर पांघरूण टाकण्याकरिता मंगळवारी सकाळपासून सरकारी दवाखान्यात अंगणवाडी सेविकांची धावपळ सर्वांना दिसली. एका उदात्त हेतुने आकारण्यात आलेल्या अंगणवाड्या, मिनी अंगणवाड्या केवळ कुणाच्या पोटापाण्याची सोय निर्माण करण्याचे साधन झाले आहे. सुसंस्कारित पिढी घडविण्याचा पाया मात्र ठिसुळ झाला. काही अंगणवाडीत बालक येतच नाही, हे वास्तव आहे. खेळायला खेळणी नाही, आजुबाजुचा गलिच्छ परिसर अंगणवाडीची दुरवस्था सांगत आहे. पर्यवेक्षकांचे अंगणवाडीत पाय लागत नाही, त्यामुळे १२ वाजता येणाऱ्या काही सेविका मदतनिसाकडे कारभार सोपवून घराचा रस्ता पकडत असल्याचे यातून समोर आले. ग्रामपंचायतींनी १० टक्के निधीतून कोणती कामे केली, अंगणवाडीत काय कामे सुरू आहेत हे गटविकास अधिकाऱ्यांनी तपासून पाहण्याची गरज आहे. (वार्ताहर)
अंगणवाडी सेविकांची झाली धावपळ
By admin | Updated: December 2, 2014 23:11 IST