प्रफुल्ल लुंगेलोकमत न्यूज नेटवर्कसेलू : काळाचा महिमा काही औरच असतो. कोणाच्या नशिबी काय येईल हे सांगता येत नाही. कामावर जाणाऱ्या महिला मजुरांना रस्त्याने कार दिसली की, आपल्याला यामध्ये कधी बसायला मिळेल याचा हेवा वाटायचा, मात्र आता मारुती कारमधून शेतमालक कापूस वेचण्यासाठी मजूर शेतात नेतो व संध्याकाळी आणून देतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसभर शेतात राबराब राबणाऱ्या मजुरांच्या नशिबी ही आता कारचा प्रवास आला आहे. कापूस वेचायला मजूर मिळत नाही, मिळालेच तर त्यांच्या सर्व अटी व शर्ती शेतमालकाला कबूल कराव्या लागतात. शेतात दिवसभर वेचलेल्या कापसाचे गाठोडे पूर्वीप्रमाणे डोक्यावरून घरी आता महिला मजूर आणत नाही. शेतापर्यंत जाण्यायेण्यासाठी वाहनाची व्यवस्था शेत मालकालाच करावी लागते. शेतात कापूस कमी आहे म्हणून वेचणीचा भावही जास्त द्यावा लागतो. अशी शेती व्यवसायात विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच बाजूने मेटाकुटीस आलेला शेतकरी अशाही परिस्थितीत सर्वांच्याच मन मर्जीने वागतो आहे. ही शेतकऱ्यांसाठी चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे.कापसाचे भाव कमी झाले आता सरासरी आठ हजार रुपये क्विंटल विकला जात आहे. वेचणीचा दर आठ ते दहा रुपये किलो आहे. शेतकऱ्यांचा शेती व्यवसाय सातत्याने तोट्यात आहे. यंदा कपाशीची बऱ्याच शेतकऱ्यांची दुसऱ्याच वेचात उलांगवाडी झाली. अनेकांनी कपाशीची उलंगवाडी करून चना, गहू पेरण्याची तजवीज केली. शेतीचा व्यवसाय मजुरांमुळे परावलंबी होत चालला आहे. मजूरही शेतमालकांच्या अडचणीचा फायदा घेऊन अटी व शर्ती घालून कामाला येत आहे. शेतमालकाला नाईलाजाने मजुरांच्या सर्व अटी मान्य कराव्या लागत आहे. शेतात जाण्या-येण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली तरच मजूर कामाला येते. त्याचबरोबर सर्व शेतीचे वाही पेरणीचे सामान मालकाने शेतात न्यायचे, रोजंदारी मजूर किंवा महिला मजूर फक्त वेळेवर कामाला लागणे व काम संपल्यावर घरी येणे एवढेच काम करते. राहिलेली सर्व कामे नंतर शेतमालकास पूर्ण करावी लागतात. अशी विचित्र अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याला शेतमालक म्हणून घेण्याची लाज वाटते. आता मजूरवर्गच मालक झाल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे.
कापूस वेचणीसह इतरही कामाला मजुरांना वाहनातून न्यावे लागते. मजूर पायदळ यायला तयार नाही. अनेक शेतकरी भाड्याच्या वाहनातून तर काही शेतकरी स्वतःच्या कारने मजुरांना शेतात ने आण करतात. कापसाचे गाठोडे ही वाहनातूनच घरपर्यंत आणावे लागते. निंदनी, खुरपण, खत देणे हे सर्व मजूर वाहनच लागते. सर्व खर्च काढला तर शेतकऱ्याला काही वाचत नाही. शेतकऱ्यांपेक्षा मजूर खाऊन-पिऊन सुखी आहे. - विनोद तलवारे, शेतकरी झडशी टाकळी.