विजय माहुरे - घोराडघरगुती सिलिंडरची सबसिडी बँक खात्यात जमा करताना ती शेतकऱ्याच्या कर्ज खात्यात जमा करण्यात आल्याचा अजब प्रकार सेलू तालुक्यात उघड झाला. शिवाय शासनाचे आदेश धुऱ्यावर बसवून नैसर्गिक आपत्तीतून कर्जाची रक्कम कपात केल्याचा प्रकारही येथे उघड झाला आहे. या दोन्ही प्रकारामुळे येथील शेतकरी चांगलेच अवाक् झाले असून त्यांनी याकडे लक्ष देण्याकरिता तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. शासनाने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांकरिता मदत पॅकेज जाहीर केले. त्या पॅकेजची रक्कम तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात करण्यात आली. याची माहिती शेतकऱ्यांना कळताच त्यांनी या रकमेची नोंद आपल्या पासबुकात करण्याकरिता बँकेत गर्दी केली. तालुक्यातील घोराड येथील शेतकरी चिंतामण महादेव महाकाळकर यांनी त्यांच्या पासबुकावर या रकमेची नोंद केली असता त्यांना मिळणारी सिलिंडरची सबसिडी व नैसर्गिक आपत्तीतील मदत जमा करून काढण्यात आल्याचे समोर आले आहे. याबाबत त्यांनी विचारणा केली असता ही रक्कम कर्जात कपात झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकारातून एक नाही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यातील रक्कम कर्जखात्यात वळती झाली आहे. अनुदानाची रक्कम कर्ज खात्यात वळती करू नये असा आदेश दिला आहे. असे असताना शेतकऱ्यांना मात्र त्यांचे पासबुक पाहुन थक्क होण्याची वेळ आली आहे.
सिलिंडरची सबसिडी कर्ज खात्यात जमा
By admin | Updated: February 2, 2015 23:10 IST