आकोली : महसूल विभागाच्या डोळेझाकपणामुळे विद्यार्थिनीची जातच बदलल्याचा प्रकार समोर आला आहे. तिला देण्यात आलेल्या जातीच्या प्रमाणपत्रावर जातीपुढे तेली असे लिहिण्यात आले. वास्तविकतेत तिची जात कुणबी आहे. सदर प्रमाणपत्र शिष्यवृत्तीकरिता सादर केले असता ते शिक्षण विभागाने नाकारल्याने तिच्यावर शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. येथील जयश्री रमेश काकडे ही गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालयात बाराव्या वर्गात शिकत आहे. तिने सर्व कागदपत्र गोळा करून सेलू तहसील कार्यालयात जात प्रमाणपत्राकरिता अर्ज सादर केला. तिला उपविभागीय अधिकारी वर्धा यांच्या स्वाक्षरीचे इतर मागासवर्गीय समाजाचे प्रमाणपत्र मिळाले; पण त्यात जातीचा उल्लेख तेली आहे. वास्तविक तिची जात कुणबी आहे. महसूल विभागाकडून झालेल्या या चुकीचा फटका सदर विद्यार्थिनीला सहन करावा लागत आहे. महाविद्यालयीन सत्र संपायला अवघे दोन महिने शिल्लक असतांना शिक्षण विभागाने ही चूक निदर्शनात आणून दिली. त्यामुळे विद्यार्थिनीवर शालेय शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेत सदर विद्यार्थिनीच्या जात प्रमाणपत्रातील चूक दुरूस्त करण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)
विद्यार्थिनीची जात बदलली
By admin | Updated: January 18, 2015 23:15 IST