कारगिल विजय दिन कार्यक्रम : शहिदांना वाहिली आदरांजली वर्धा : जिल्ह्यात विविध ठिकाणी कारगिल विजय दिनानिमित्त मंगळवारी घेण्यात आलेल्या कार्यक्रमातून शहिदांना अभिवादन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला. देवळी परिसर देवळी : एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील एन.सी.सी. पथकाच्यावतीने महाविद्यालयाच्या उद्यानात उभारलेल्या कारगिल शहीद स्मृती स्मारकासमोर पुष्पचक्र वाहून शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली. ‘शहीद जवान अमर रहे’ आणि ‘कारगिल विजय दिन चिरायू होवो’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी नगराध्यक्ष शोभा तडस यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना तडस म्हणाल्या, कारगिल लढाईत शौर्य दाखवून सैनिकांनी देशाकरिता काहीही करू शकतो, हे दाखवुन दिले. आज अशाच सैनिकी मानसिकतेची देशाला नितांत गरज आहे. म्हणून देश प्रथम या भावनेला प्राधान्य द्या, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. कार्यक्रमाचे संचालन सार्जेंट कोमल गोमासे हिने तर आभार सार्जेंट प्रफुल बेले यांनी मानले. अंडर आॅफिसर वैभव भोयर, आशिष परचाके, रवी बकाले, रोव्हर राजकुमार भोवते व छात्र सैनिकांनी सहकार्य केले. सायकल अभियान देवळी : आतंकवाद, दहशतवाद व हिंसक घटनांवर अंकुश निर्माण करणे आज गरजेचे आहे. यासाठी देशभक्तीची भावना निर्माण झाली पाहिजे. केवळ सैन्यदल व पोलीस दलांवर अवलंबून न राहता सुजान नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने पुढे येवून राष्ट्रीय एकात्मता टिकविण्याचे कार्य केले पाहिजे. सैनिकी प्रशिक्षण प्राप्त युवक यात महत्वाची भूमिका निभवू शकतात, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुरेश उपाध्याय यांनी केले. एन. सी. सी. व रोव्हर स्काऊटस् व रेंजर गाईडस पथकाच्या वतीने ‘सायकल रॅली’ काढण्यात आली. यात सहभागी छात्रसैनिकांनी नागरिकांसोबत हितगुज केले. धर्म, जात, भाषा व प्रांत विसरून ‘राष्ट्राकरिता सर्वकाही’ ही भावना प्रसारित करण्याच्या हेतूने ‘राष्ट्रीय एकात्मता सायकल रॅली’ आयोजित केली होती. सायकलच्या समोर फलक लावून कॅडेट्सने शहरवासियांना ‘एकता ही राष्ट्र को मजबूत बनाती है’, ‘एकाता और अनुशासन’, ‘युवा ही राष्ट्र की संपत्ती है’ असा संदेश दिला. ही मिरवणूक शहर परिसरातून काढण्यात आली. रॅलीत एन.सी.सी. अधिकारी कॅप्टन प्रा. मोहन गुजरकर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. संतोष मोहधरे, रेंजर लिडर अश्विनी घोडखांदे, सहायक रोव्हर लिडर अमोल तडस, रोव्हर रवी बकाले, सार्जेंट पुजा गिरडकर व ४० छात्रसैनिक, रोव्हर्स व रेंजर्स सहभागी झाले होते. इंडियन मिलिटरी स्कूल नाचणगाव : इंडियन मिलीटरी स्कूल, पुलगाव येथे कारगिल विजय दिवस विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापक रवीकिरण भोजने, अतुल वाळके, कोहळे, मुजेंवार, जगताप, नितीन कोठे, घारफळकर, ढोबळे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहली. यशस्वीतेकरिता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी/वार्ताहर)
सायकल रॅलीतून छात्र सैनिकांनी दिला एकात्मतेचा संदेश
By admin | Updated: July 28, 2016 00:43 IST