वर्धा : वेतनवृद्धीच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी गुरूवारी संपावर गेले. या ‘बस बंद’ची कल्पना नसल्याने प्रवासी नित्याप्रमाणे बसस्थानकावर जात होते; पण बसेस दिसत नसल्याने त्यांची कोंडी होत होती. बसेस नसल्याने प्रवाशांना मिळेल त्या वाहनांचा आधार घेत गंतव्य स्थळ गाठावे लागले. वर्धा शहरातील बसस्थानकावर पोहोचलेल्या प्रवाश्यांना उपस्थित कर्मचारी संपाची माहिती देत होते. यामुळे प्रवाशांचा हिरमोड होत होता. बसेस नसल्याने प्रवाशांना आल्या पावली परत जावे लागत होते. बसेसच्या या संपामुळे त्यांनी मिळेल त्या खासगी वाहनाने आपले गाव जवळ करण्याचा प्रयत्न केला. याचा लाभ खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना झाला. त्यांनी मिळेल त्या मार्गे प्रवासी वाहनांमध्ये कोंबून नेत असल्याचे दिसून आले. यातही रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांनीही रस्त्याने धावत असलेल्या आॅटो व खासगी प्रवासी वाहनांना चालान दिल्याचे दिसून आले. बहुतांश कर्मचाऱ्यांनी संपामध्ये सहभाग घेतल्याने संपूर्ण जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्थाच प्रभावित झाल्याचे दिसून येत होते. हिंगणघाट, वर्धा, पुलगाव, तळेगाव (श्या.पं.) व आर्वी या सर्वच आगारातील बसेस कर्मचाऱ्यांनी बाहेर काढल्या नाहीत. यामुळे प्रवाशांना अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचाच आधार घ्यावा लागल्याचे दिसून आले. परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या संपाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील नागरिक तसेच दररोज ये-जा करणाऱ्या नोकरदारांना सहन करावा लागला. शाळकरी विद्यार्थ्यांनाही बसेस न आल्याने सकाळी मिळेल त्या वाहनाने वर्धा शहर गाठावे लागल्याचे दिसून आले. या संपामध्ये संघटनेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत काकडे, राज्यसचिव प्रमोद गुंडतवार यांच्यासह जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्वच संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कर्मचाऱ्यांनी सहभाग मोठ्या संख्येने घेतला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
एसटीचा कडकडीत बंद
By admin | Updated: December 18, 2015 02:39 IST