घोराड : पावसाचा थेंब अन् हवेचा झोका येताच वीज खंडित होण्याचा प्रकार बेलगावात नित्याचाच झाला आहे. याचा त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. गत तीन दिवसांपासून रात्रीचा वीज पुरवठा खंडित होत असल्याने शनिवारी येथील नागरिकांनी वीज वितरण कार्यालयाला धडक दिली. वीज वितरण कार्यालयात ५० हून अधिक नागरिक आले असता येथे कोणीच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी सहायक अभियंत्याच्या खूर्चीलाच निवेदन देत रिकाम्या हातांनी गाव गाठले. अनेक दिवसांपासून ही समस्या आहे. वारंवार रोहित्रावर फ्यूज टाकून औटघटकेचा वीजपुरवठा सुरू करण्याचा प्रकार होत आहे. गत दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असताना वीजपुरवठा रात्रभर खंडित राहत असल्याने हा त्रास दूर करावा, अशी मागणी बेलगाव वासियांनी या निवेदनाद्वारे केली आहे. विशेष म्हणजे बेलगाव हे सेलू नगरपंचायतमध्ये समाविष्ट असताना नगर पंचायतच्या नगरसेवकांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. निवदेन देताना विनोद खोडके, सुरेश भानारकर, नरेश खोडके, अनिल कुडमते यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.(वार्ताहर)
खंडित वीजपुरवठ्याने बेलगावकर त्रस्त
By admin | Updated: July 10, 2016 01:30 IST