वाहतुकीस अडथळा : पूल बांधण्याचा ठराव न. प. च्या बांधकाम समितीत मंजूरवर्धा : शहरातील मुख्य मार्केट परिसरात दुर्गा टॉकीज च्या समोरच आतून वाहात असलेल्या नाल्याची सफाई करताना खोदलेला खड्डा अनेक दिवसांपासून तसाच आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा येते. सदर खड्डा केव्हा बुजविला जाणार याबाबत संबंधितांना विचारले असता येथे लहान पुलाचे बांधकाम होणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु कामाला अद्याप सुरुवात नसल्याने पुलाच्या प्रतीक्षेत रस्त्याची गल्ली झाली आहे. पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वीच शहरातील नाल्यांच्या सफाईची कामे हाती घेण्यात आली. यात खुल्या नाल्यांची सफाई लवकर होत असली तरी रस्त्याच्या खालून गेलेल्या नाल्यांमध्ये अडकलेला गाळ काढताना अडचण येते. शहरातील मुख्य मार्केट परिसरात दुर्गा टॉकीज जवळून रस्त्याच्या खालून शहरातील सांडपाणी वाहून जाते. परंतु येथील नाला बुजल्याने अनेक दिवसांपासून तेथे पाणी साचत होते. नागरिकांच्याही तक्रारी वाढल्या होत्या. या कारणाने यंदा उन्हाळ्यात नालेसफाई करताना या नाल्यात खालून गेलेल्या टेलीफोनच्या वायर्सला मोठ्या प्रमाणात प्लास्टिक अडकून असल्याचे लक्षात आहे. या कारणाने हा संपूर्ण भाग खोदण्यात आला. परंतु यातून बाहेर काढलेला मलबा अद्यापही तसाच असून भलेमोठे भगदाडही तसेच आहे. त्यामुळे रस्ताची गल्ली झाली आहे. यातच पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे ही माती रस्त्यावर पसरून चिकचिकही वाढली आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन अपघाताचा धोकाही वाढला आहे. गैरसोय होत असल्याने नागरिकही संताप व्यक्त करीत आहे. अनेक दिवस लोटूनही सदर खड्डा का बुजविला नाही याबाबत नगर परिषदमध्ये संबंधिताना विचारले असता येथे असलेली नाली पूर्णत: खराब झाली आहे. त्यामुळे संपूर्ण काम नवीन करून येथे उंच स्लॅब पूल बांधणे गरजचे आहे. त्यासाठीच कार्यालयीन प्रक्रिया सुरू असून सोमवारपासून कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले.(शहर प्रतिनिधी)
पुलाच्या प्रतीक्षेत रस्त्याची झाली गल्ली
By admin | Updated: July 25, 2015 02:20 IST