लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही वर्षापासून शेतकऱ्यांना एचटीबीटी कपाशी बियाण्यांची अवैधरित्या विक्री केली जाते आहे. लाखो पाकिटे इतर राज्यांतून जसे की, आंध्र प्रदेश, गुजरात, तेलंगणा राज्यातून येत आहेत.
कुठलीही खात्री नसलेल्या या बियाणांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. असे बियाणे व त्यांना विक्री करून फसवणूक करणारे एजंट प्रत्येक गावात काम करत आहे. शेतकऱ्यांची ही लुबाडणूक थांबवावी, याविरोधात जिल्हा कृषी व्यवसायी संघाने ३० रोजी एक दिवसीय संप पुकारला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांना दिले.
ज्या वाणाला परवानगी नाही, असे वाण व सोबत एचटीबीटी वाण दलाल मोठ्या प्रमाणात आणत आहे. शासनातर्फे कोणतीही दखल घेतली नसल्याने कृषी विक्रेता मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशा दलालांकडून बोगस किटकनाशक, तणनाशक, शेतकऱ्यांपर्यंत पोहचत आहेत.
'लिंकिंग' हा विषय गंभीरचखत कंपनीकडून होणारे लिंकिंग हा विषय गंभीर आहे. केवळ कृषी केंद्रालाच टार्गेट केले जाते, त्यांनाच कारवाईची ताकीद दिली जाते. मात्र, कधीही लिंकिंग करणाऱ्या कंपनीवर एकही कारवाई झालेली नाही. अवैध विक्रीमुळे परवानाधारक विक्रेत्यांचे नुकसान होत आहे. याविरोधात जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रचालकांनी आपली कृषीकेंद्रे बंद ठेवली.
यांची होती उपस्थिती...निवेदन देताना संघाचे अध्यक्ष रवी शेंडे, सचिव मनोज भुतडा, श्रीकांत महाबुधे, राजेंद्र वंजारी, प्रफुल्ल देवतळे, पंकज श्रीमाल, गणेश चांडक, विनोद भुतडा, संदीप कुंभारे, श्रिनीवास चांडक, आदींची उपस्थिती होती.