पुलगाव : जवळपास ५० हजार लोकसंख्या असलेल्या पुलगाव शहराला केंद्रीय दारूगोळा भांडारामुळे वेगळी ओळख आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे शिपाई, व्यावसायिक, नोकरी व शिक्षणाकरिता सतत नागपूर, अमरावतीकडे जाणे-येणे करणारे विद्यार्थी, कर्मचारी यांना वक्तशीर ये-जा करण्यासाठी रेल्वे गाड्या नसल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पुलगाव येथे अतिजलद रेल्वे गाड्यांचा थांबा देण्याची मागणी येथील प्रवासी करीत आहेरेल्वे मंत्रालयाने अनेक नवीन गाड्या सुरू केल्या, मात्र पुलगावकरांच्या तोंडाला प्रत्येक वेळी पानेच पुसल्या गेली. गाड्या तर सोडाच काही सुपरफास्ट गाड्यांचा थांबासुद्धा मिळू शकला नाही. सकाळची जर वेळ सोडली तर नागपूरकडे जाण्यासाठी २९ डाऊन कुर्ला हावडा एक्सप्रेस वगळता सायंकाळपर्यंत नागपूरकडे जाणारी सोयीची गाडी नाही. रात्री १२ नंतर मुंबई, पुणे, अमदाबादकडे जाणारी कुठलीही गाडी नाही. पुलगावहून चेन्नईकडे जाणारी गाडीसुद्धा नाही. रेल्वे मंत्रालयाने दैनिक नवजीवन एक्सप्रेस २६५५ डाऊन व २६५६ अप दैनिक आझाद हिंद एक्स्प्रेस २१२९ डाऊन व २१३० अप, बिलासपूर पुणे एक्स्प्रेस २८५० डाऊन व २८४९ अप, चैन्नई जोधपूर एक्स्प्रेस ६१२६ डाऊन व ६१२५ अप, नागपूर-पुणे गरीबरथ २११४ डाऊन व २११३ अप या सुपरफास्ट गाड्या सुरू केल्या, परंतु पुलगावसारख्या सैनिक व कामगाराच्या या शहराला या गाड्यांना थांबा दिला गेलेला नाही. यामुळे पुलगावच्या प्रवाशांची चांगलीच अडचण होत आहे.शहरवासी व प्रवासी मंडळाने वारंवार निवेदने दिली, परंतु रेल्वे मंत्रालयांकडून प्रत्येकवेळी या मागणीला वाटण्याच्या अक्षता लावल्यात आल्या. या प्रवाशी गाड्यांना पुलगाव, स्थानकावर थांबा मिळावा, या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे अशी मागणी प्रवासी वारंवार करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
पुलगावला अतिजलद रेल्वे गाड्यांचा थांबा द्या
By admin | Updated: August 1, 2015 02:35 IST