कारंजा (घा.) : तालुक्यातील बोरी शिवारातील शेतकरी विश्वनाथ पांडुरंग मस्के यांच्या शेताच्या धुऱ्यावर चंदनाची दोन झाडे होती. ती झाडे अज्ञात चोरट्यांनी तोडून नेल्याची घटना शनिवारी उघड झाली. वृत्त असे की, विश्वनाथ मस्के यांचे बोरी शिवारात शेत आहे. त्यांनी शेतातील धुऱ्यावर चंदनाची दोन झाडे लावली होती. ती झाडे अज्ञात चोरट्यांनी रात्री कापून नेली. या प्रकारातील चोरीची ही महिनाभरातील दुसरी चोरी आहे. यापूर्वी आगरगावातील शेतकरी सिंधुबाई कडवे व शांताबाई चौधरी यांच्या शेतातील चंदनाचे झाडे कापतांना चोरट्यांना रंगेहात पकडण्यात आले होते. यात यशवंत संतोष कोवे व इतरांना अटक करण्यात आली होती. ही चोरीही त्यांनीच केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्गदर्शनात क्षेत्र सहायक एम. आर. राउत व बिट वनरक्षक डब्ल्यू.आर. ढोबाळे यांनी मौका चौकशी करून पंचनामा केला. कारंजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
शेताच्या धुऱ्यावरील चंदनाची झाडे चोरली
By admin | Updated: November 22, 2015 02:17 IST