कर्मचाऱ्यांनी केला आवाज बुलंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 12:31 AM2018-08-08T00:31:16+5:302018-08-08T00:31:56+5:30
राज्य कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी त्रि-दिवसीय संप पुकारला आहे. सदर आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत स्थानिक ठाकरे मार्केट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी त्रि-दिवसीय संप पुकारला आहे. सदर आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत स्थानिक ठाकरे मार्केट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून सदर आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्या तात्काळ निकाली काढा अन्यथा बेमुदत संप असा इशाराच सरकारला देत आपला आवाज बुलंद केला.
राज्य कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या गत अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या पूर्णत्त्वास जाव्या यासाठी यापूर्वी संबंधितांना निवेदने देत अनेक आंदोलन करण्यात आली. परंतु, मागण्यांवर विचार न झाल्याने ७,८ व ९ आॅगस्ट या कालावधीत संप पुकारण्यात आला आहे. मंगळवारी आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढून जिल्हाकचेरीवर धडक देत विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. सातव्या वेतन आयोगाची प्रत्यक्ष अंमलबजावणी दिलेल्या आश्वासनानुसार करण्यात यावी. जानेवारी २०१७ पासून महागाई भत्त्याची १४ महिन्याची थकबाकी आणि जानेवारी २०१८ पासून वाढीव महागाई भत्ता फरकाच्या रक्कमेसह मंजूर करावा. अशंदायी पेन्शन योजना रद्द करून १९८२ ची परिभाषिक पेन्शन योजना सर्वांना लागू करावी. सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरावे. सर्व नोंदणीपटावर असलेल्या अर्जधारकांना एकवेळची बाब म्हणून अनुकंप तत्त्वावर नियुक्त्या देण्यात याव्या. प्राथमिक आरोग्य केंद्रातील महिला परिचरांना किमान वेतन देण्यात यावे. शिक्षण क्षेत्रातील विना अनुदान धोरण रद्द करण्यात यावे. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे १०० टक्के समायोजन करावे. निवृत्तीचे वय ६० वर्षे व ५ दिवसांचा आठवडा करावा आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. आंदोलनाचे नेतृत्त्व हरिषचंद्र लोखंडे, नितीन तराळे, बी.व्ही. भोयर, विनोद भालतडक यांनी केले. आंदोलनात जयप्रकाश थोटे, पांडुरंग भालशंकर, राजू चंदनखेडे, महेंद्र सालंकार, धर्मपाल मानकर, संजय पाटील, मंदा चौधरी, प्रविण देशमुख, शशांक हुलके, प्रमोद खोडे, प्रविण भोयर, अजय वानखेडे यांच्यासह सुमारे २० विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहून नोंदविला निषेध
या संपात आरोग्य कर्मचारीही सहभागी झाले आहे. परंतु, नागरिकांना आरोग्य सेवा घेताना कुठलाही त्रास होऊ नये या हेतूने जिल्ह्यातील २७ प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहून काळ्या फिती लावून सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध केला. रुग्णसेवा ही ईश्वर सेवा हा उद्देशच यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवा देताना आज जोपासला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.